Rupali Thombre: 'बच्चू ये तेरे बस की बात नही', रुपाली ठोंबरेंचा श्रीकांत शिंदेंना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 08:28 PM2022-09-05T20:28:54+5:302022-09-05T20:29:51+5:30
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना, बच्चू ये तेरे बस की बात नही, असे म्हणत टिका केली.
मुंबई - राज्यातील सत्तांतरानंतर खरी शिवसेना कुणाची यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यात येत्या दसरा मेळावा कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. परंतु यंदा दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला आहे. त्यावरुनच, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दोन्ही गटाला सुनावलं. तसेच, मुख्यमंत्री शिंदे यांच्या गणेशोत्सव दौऱ्यावरुनह त्यांच्यावर टिकाही केली. त्यानंतर, शिंदेपुत्र खासदार श्रीकांत यांनी अजित दादांवर पलटवार केला. त्यावर, आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी श्रीकांत शिंदेंना खोचक टोला लगावला आहे.
दसरा मेळाव्यावरुन बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्यांच्या हातात सत्ता ते त्यांना पाहिजे असेल तसं करतात. त्यामुळे वाद घालून चालणार नाही. सर्वसामान्य जनता कुणाच्या पाठिशी आहे हे शिवाजी पार्कवरील सभा झाल्यावर कळेल, तसेच, निवडणुका झाल्यावर कुणाची शिवसेना खरी हेदेखील कळेल असं म्हटलं आहे. अजित पवारांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Eknath Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "दादा हा 'शो' नाही, पहाटेच्या फ्लॉप 'शो'सारखा… हा 'शो'ले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा!" अस म्हणत खोचक टोला लगावला आहे. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना, बच्चू ये तेरे बस की बात नही, असे म्हणत टिका केली.
'आपण बोलू नका, थोडी सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवून टीका करा. आपण कोणावर टीका करतो याचं भान ठेवावं अन्यथा महाराष्ट्रात हाहाकार माजेल. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. तेव्हा अजितदादांवर बोलताना थोड आचपेच ठेवून बोला." अजितदादांवर बोलण्यासाठी तुमच्या पप्पांना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगा. बच्चू ये तेरे बस की बात नाही, असे म्हणत रुपाली पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यामुळे, राष्ट्रवादी आणि शिंदेगट यांच्यातील वाद रंगला आहे.
श्रीकांत शिंदेंच ट्विट
"दादा हा 'शो' नाही, पहाटेच्या फ्लॉप 'शो'सारखा… हा 'शो'ले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा! आणि हो… हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या 'ट्रेलर'नेच धडकी भरली?.... पिक्चर अभी बाकी है!!!" असं श्रीकांत शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच khatteangur हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
अजित पवारांची एकनाथ शिंदेंवर टीका
अजित पवार यांनी माध्यमांकडे सध्या कुठल्या बातम्या नाहीत. अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीसांनी भेटीबाबत नकार दिलाय. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने काम करत असतो. जनता निवडून देत असते. गणेशोत्सव वर्षानुवर्षे सुरू आहेत. यंदा गाठीभेटी वाढल्या आहेत. परंतु आम्हीही गणपतीच्या दर्शनासाठी जातो पण कॅमेरा घेऊन जात नाही. जो गणेशभक्त आहे, त्याने अशाप्रकारे देखावा दाखवण्याचं कारण नाही. पूर्वीच्या काळात शोमॅन होते, राज कपूर शोमॅन म्हणून ओळखले जायचे तसं हल्ली काहींना शो करायची सवय आहे. जनतेनेच बघावे काय चाललंय काय नाही असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.