पुणे : महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजनेत काम करणाऱ्या समूह संघटिकांच्या भरतीसाठी लागू केलेली वयाची अट अखेर प्रशासनाने मागे घेतली आहे. ही अट लावल्याने बेरोजगार होणाऱ्या समूह संघटिकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. प्रशिक्षण केंद्रांचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे.दर सहा महिन्यांनी या कर्मचाऱ्यांची सेवा काही दिवस खंडित केली जाते व पुन्हा त्यांना कामावर घेतले जाते. अनेक वर्षे ही पद्धत सुरू असताना महापालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी अचानक सरकारी नोकर भरतीची वयाची अट या पदांसाठी लागू करत असल्याचा फतवा काढला. त्यामुळे अनेक वर्षे काम करणाऱ्या समूह संघटिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. प्रशिक्षण केंद्रांमध्ये काम करणाऱ्यांनाही वयाचा नियम लागू करण्यात आला होता. या नियमानुसारच भरती करण्यात येईल, असे नागरवस्ती विकास विभागाचे प्रमुख संजय रांजणे यांचे म्हणणे होते.सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी यासंदर्भात थेट आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वयाची अट मागे घेण्याची मागणी केली. माजी महापौर प्रशांत जगताप यांनीही त्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आता वयाची अट काढून टाकण्यात आली आहे. मानधन तत्त्वावर काम करणाऱ्यांसाठी ही अट लागू नाही, असे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे आता या समूह संघटिकांना पुन्हा कामावर रुजू करून घेतले जाणार आहे. यासंबधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत वयाची अट नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. प्रशिक्षण केंद्रासाठी कर्मचाऱ्यांची भरती करतानाही आता जुन्यांच्या नियुक्तीला प्राधान्य देण्यात येईल, असे रांजणे यांनी सांगितले. त्यामुळे या निर्णयाचा त्यांनाही दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी) गेली अनेक वर्षे या समूह संघटिका नागरवस्ती विकास विभागात मानधन तत्त्वावर काम करतात. केंद्र, राज्य तसेच महापालिकेच्या विविध समाजघटकांसाठी असलेल्या वैयक्तिक तसेच सामूहिक लाभाच्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम या समूह संघटिकांकडून केले जाते. तसेच प्रशिक्षण केंद्रांमधून सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना व्यवसायोपयोगी प्रशिक्षण दिले जाते. वर्षाला १० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या केंद्रांचा लाभ घेत असतात. गेले महिनाभर या केंद्रांचे तसेच समूह संघटिकांचे काम ठप्प झाले होते.
समूह संघटिका भरतीची वयाची अट मागे
By admin | Published: April 12, 2017 4:16 AM