पुणे : आज पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतात. आजच्या मतदानाकडे मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसले. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये 46.03% मतदान झाले तर शिरूर मतदारसंघामध्ये 43.89% मतदान झाले आणि पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये 44.9% मतदान झाले. ही आकडेवारी सायंकाळी पाचपर्यंतची आहे.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते पण त्यामध्ये प्रशासनाला यश आल्याचे दिसले नाही. तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये 50% पेक्षा कमी मतदान झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सलग आलेल्या सुट्यांमुळे पुणेकरांनी आणि पिंपरी-चिंचवडकरांनी मतदानापेक्षा पर्यटनाला महत्त्व दिल्याचे या आकडेवारीवरून दिसते. कारण गेल्या चार दिवसांपासून शहरातील ट्रॅफिकही कमी झाले होते.
उरणमध्ये सर्वाधिक मतदान-
मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये उरण विधानसभा मतदारसंघात 55.05 टक्के मतदान झाले. हे या लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदान आहे. त्यानंतर पनवेलमध्ये 42.24% कर्जतमध्ये 49.0% त्यानंतर मावळ विधानसभा मतदारसंघात 50.12% चिंचवड विधानसभा मतदारसंघात 43.33% आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये 42.2% मतदान झाले.
हडपसरमध्ये सर्वात कमी मतदान-
शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 43.89% मतदान झाले. त्यामध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये 47.31% मतदान झाले. आंबेगाव विधानसभेमध्ये 53.71%, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघांमध्ये 48.07%, शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये 41.15% आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये 42.24% मतदान झाले. या मतदारसंघातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या हडपसरमध्ये सर्वात कमी 38.04% मतदान झाले.
शिवाजीनगरमध्ये सर्वात कमी मतदान-
पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये एकून 44.9% मतदान झाले. त्यामध्ये कसबा पेठेत 51.07%, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये 44.01 टक्के मतदान झाले तर पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये 46.8%, कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये 48.91%, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये 38.73% आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये 40.5% मतदान झाले.