पुणे : मंगळवारी (दि.२०) आषाढी एकादशी आहे. त्यामुळे मार्केट यार्डात रताळाची आवक मोठी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव, मांजरगाव तसेच इतर काही गावांतून ही आवक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली असून घाऊक बाजारात भाव मात्र स्थिर आहेत, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.
मागील वर्षी कोरोनामुळे रताळींची विक्री पूर्णपणे घटली होती. या वर्षी मात्र मागणी आहे.
करमाळा भागातील रताळांना दहा किलोस ३०० ते ३५० रुपये भाव मिळत आहे. अद्याप कर्नाटक भागातील रताळाची आवक झालेली नाही. करमाळा भागातून दाखल झालेली रताळ गावरान आणि आकाराने लहान असतात. त्याची चव गोड असते.
बाजारात तीन ते साडेतीन हजार पोतींची आवक झाली आहे. आषाढी एकादशीला बहुतांश लोक उपवास करत असतात. त्यामुळे रताळाला जास्त मागणी असते, असे अमोल घुले यांनी सांगितले.
-------------------------------
फोटो : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डात रताळाची मोठी आवक झाली आहे.