लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची बॅकलॉग व श्रेणी सुधार परीक्षा येत्या ८ डिसेंबरपासून ऑनलाइन व प्रॉक्टर्ड पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
विद्यापीठाने कोरोनामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. परंतु, या परीक्षेत प्रॉक्टर्ड पद्धतीचा वापर करण्यात आला नव्हता. परिणामी परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी गैरप्रकार करता आले,अशी चर्चा शिक्षण वर्तुळात झाली. त्यामुळे या पुढील परीक्षांसाठी प्रॉक्टर्ड पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
काही विद्यार्थ्यांनी गुगलवर प्रश्नांची उत्तरे शोधून अंतिम वर्षाची परीक्षा दिली. तसेच काहींनी मित्रांच्या मदतीने पुस्तकात प्रश्नांची उत्तरे शोधून प्रश्नपत्रिका सोडवली. त्यामुळे परीक्षेचा निकाल ३० ते ३५ टक्क्यांनी वाढला. परीक्षा विशिष्ट वातावरणात कोणताही गैरप्रकार करता येणार नाही,अशा पद्धतीने घेणे अपेक्षित आहे.परंतु कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचे दिसून आले.त्यामुळे विद्यापीठाने प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी केली आहे.
----------------------
“परीक्षेदरम्यान इमेज प्रोसेसिंग करण्यात येईल. त्यात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा दिसून आल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल.”
- महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ