माजी ज्येष्ठ नगरसेवकांचे नगराध्यक्षांना पत्र
माजी ज्येष्ठ नगरसेवकांचे नगराध्यक्षांना पत्र
बारामती :बारामती शहरात पिण्याचे पाणी, पावसाचे पाणी, भुयारी गटारे (ड्रेनेज) या कामांच्या पाईपलाईन टाकण्याकरिता व अन्य कामांकरिता अनेक रस्ते खोदले आहेत व खोदले जात आहेत. परंतु, ते काम पूर्ण झाल्याबरोबर योग्य प्रकारे रस्ते बुजवले जात नाहीत. काम पूर्ण होऊन २ ते ३ महिने झालेतरी खोदलेले चर, खड्डे चांगल्या प्रकारे बुजवण्याची दक्षता घेतली गेली नाही.
अशोक नगर, सेंट्रल बिल्डिंग (प्रशासकीय इमारत) समोरून जाणारा रस्ता, फलटण रोड इत्यादी बऱ्याच ठिकाणी विविध कामासाठी खोदलेले रस्ते व खड्डे योग्य प्रकारे न बुजवल्याने - पॅचवर्क न केल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीच्या, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. पावसात या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. याबाबत माजी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनी नगराध्यक्षांना पत्र लिहीत लक्ष घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ढोले यांनी निदर्शनास आणले आहे.
शहरात कसबा वैगरे भागात डेंग्यू व तत्सम साथरोगाचा प्रादुर्भाव, कोरोनामुळे बारामतीच्या नागरिकांनी बरेच काही सोसले आहे व सोसत आहेत त्यात आणखी या साथरोगांची भर पडायला नको. हा प्रादुर्भाव रोखण्याकरिता यावर वेळीच त्वरित योग्य व आवश्यक त्या उपाययोजना करण्याची दक्षता घ्यावी, संबंधित सूचना द्याव्यात. वरील बाबतीत योग्य ती कार्यवाही व उपाययोजना त्वरित व्हावी, असे आवाहन ढोले यांनी केले आहे.