पुणे : स्वामी विवेकानंदांनी दलितांना न्याय मिळावा, यासाठी लढा दिला. दलितांसाठी १०० टक्के आरक्षण मागणारा माणूस दुर्देवाने दलितांना माहीत नाही. विवेकानंद, शाहू महाराज, महाराज सयाजीराव गायकवाड, संत तुकाराम यांनी कायम बहुजनांची बाजू मांडली. ही नावे घेतली तर आंदोलन व्यापक होते, हे मी आंबेडकरवाद्यांना सांगू इच्छितो. संत हे शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी समाजातील समानतेसाठी लढा दिला, असे मत माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी व्यक्त केले. दोन टक्के कर वाढवला तर अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या गोष्टी समाजाला मोफत पुरवता येतील, याबाबत मंत्र्यांना पत्र लिहिले आहे, असेही त्यांनी नमूद केले. स्वामी विवेकानंदांच्या ११७ व्या स्मृतिदिनानिमित्त लोकायत, जनता दल सेक्युलर, अभिव्यक्ती, बहुसांस्कृतिक एकता मंच आदी संस्था-संघटनांच्या वतीने ४ जुलै हा दिवस धार्मिक सलोखा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गुरुवारी गूडलक चौक येथे सलोखा सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कोळसे पाटील बोलत होते. ‘ना भगव्यांचे, ना हिंदूंचे, विवेकांनंद सर्वांचे’, ‘प्यार बाटते चलो’, ‘जातीधर्माचे बंधन तोडू, माणसामाणसातील नाते जोडू’ अशा घोषणा यावेळी तरुण-तरुणींनी दिल्या. कोळसे पाटील म्हणाले, ‘आपल्या देशात खरे बोलणे हा गुन्हा ठरतो. परंतु, चुकीच्या गोष्टींविरोधात बोलले पाहिजे. धार्मिक सलोख्यासाठी अनेक संघटना रस्त्यावर येऊन काम करत आहेत,समाजात जागृती घडवत आहेत. धर्माच्या नावावर वाढणा-या बांडगुळांनी आपला मेंदू सडवला आहे. हा मेंदू जागृत केला पाहिजे.’आझम कँपसचे ऋषी आचार्य म्हणाले, ‘आज धर्माच्या नावाखाली कटुता पसरवली जात आहे. राम म्हटले नाही म्हणून हत्या केली जात आहे. अशा परिस्थितीत सांप्रदायिक सौहार्द ही भारताची ओळख कायम राहिले पाहिजे. कट्टरता सहन केली जाणार नाही, हा संदेश सर्वदूर पसरला पाहिजे.’जमात ए इस्लामचे आझीम शेख म्हणाले, ‘आपण सर्वांनी द्वेष बाजूला ठेवून माणुसकी जपु या. धर्माच्या नावाखाली षड्यंत्र रचले जात असताना धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांना समजून घेतले पाहिजे. बंधुभावाचा संदेश पसरवला पाहिजे. भारत बलशाली बनवण्यासाठी, सोनेरी दिवस परत आणण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे.’अखिल भारतीय बहुजन सेनेचे निलेश वाघमारे म्हणाले, ‘भारत देश अखंड ठेवायचा असेल तर धार्मिक सलोखा ही काळाची गरज आहे. विवेकांनंदांच्या स्वप्नातील भारत निर्माण करावा लागेल. जगावर राज्य करायचे असेल तर धर्माधर्मातील मतभेद मिटले पाहिजेत. धर्माच्या ठेकेदारांनी सलोख्याचे विचार कैद केले आहेत. त्यातून बाहेर पडून देशाच्या विकासाला चालना देणारे विचार पुढे यावेत.’अलका जोशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नीरज जैैन तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दुर्देवाने दलितांना स्वामी विवेकानंद माहीत नाहीत: बी.जी.कोळसे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 1:00 PM
दलितांसाठी १०० टक्के आरक्षण मागणारा माणूस दुर्देवाने दलितांना माहीत नाही.
ठळक मुद्देधार्मिक सलोखा दिन