हे कधी करियरच्या बाबतीत होतं तर कधी नात्यांच्या.
तर कधी वरवर सगळं आलबेल दिसत असतं आणि आंत मात्र उलथापालथ सुरू असते.
कधी व्यवहारांची गणितं चुकतात तर कधी अंदाज फसतात.
कधी आपला काहीही दोष नसताना अपयशाचे फास आवळले जातात.
आणि बऱ्याचदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!
मग चहुबाजूनी जी कोंडी होते त्यालाच आपण म्हणतो बॅडपॅच !
असा बॅडपॅच आला की तो आपल्या आयुष्यात किती काळ राहील हे सांगता येत नाही मात्र एकदा आला की आयुष्य नकोसं करुन सोडतो...कधी कधी जगण्याला फूल स्टॉप द्यावा, असंही वाटून जातं.
आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं, तरी हा असा बॅड पॅच कधीतरी येतोच. आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...
पण बॅडपॅच जगण्याचा भाग असेल तर नाकारून कसं चालेल. यायचा तर येउद्या.
आपण दोन गोष्टींची मानसिक तयारी ठेवली तर त्यातील त्रास बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. एक म्हणजे आपला दृष्टिकोन आणि स्वीकारण्याची मानसिकता.
आहे ही परिस्थिती जशीच्या तशी मनापासून स्वीकारली की निदान त्या परिस्थितीविषयीच्या तक्रारी कमी होऊन जातात. आणि मगच त्यावर मात करण्याच्या काही आशा निर्माण होऊ शकतात. दुसरा महत्त्वाचा दृष्टिकोन! आपण पाहतो कसं हे फार महत्त्वाचं. दृष्टिकोन जितका सकारात्मक ठेवू तेवढं लढण्याचं, जगण्याचं बळ मिळतं.
बॅडपॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!
खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं राहतं हे फक्त आणि फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!
आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.
अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगात आपण कसे वागतो,
काय बोलतो, काय करतो, काय निर्णय घेतो....
हे आपलं आपल्याला समजू शकतं...
आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. हा वाईट काळ खूप काही काही शिकवून जातो.
यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो.
अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे आपल्या हातात असतं... ते मात्र आत्मसात करायला हवं.
आपला बॅडपॅच आहे हेच नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि आंधळेपणाने स्वतःचं नुकसान करत रहायचं का, तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!
संघर्षातून जीवन जगण्याची मजा काही औरच......
प्रयत्न आणि अनुभव शिकवत राहतात बरंच काही. सगळं संपलंय असं कधीच नसतं आयुष्यात. कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे आयुष्य बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.
तेव्हा बॅडपॅच आले तर येउद्या..
ते भल्याभल्याना चुकलेले नाहीत. मग तो सचिन असो वा अमिताभ !
त्या काळात वागायचं कसं, दृष्टिकोन कसा ठेवायचा आणि स्वतःला आणखी तावून सुलाखून बाहेर कसं काढायचं हे त्यांनी पाहिलं. आपल्याही हातात तेवढंच असतं.
प्रतिकूलतेत संधी अधिक असतात हे लक्षात ठेवून प्रयत्न करणं सोडायचं नाही. आज ना उद्या या दिवसांतून बाहेर येऊच आणि फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेऊ हे मनात ठेवायचं.. या काळात संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, अडवले, थांबवले, असे काहीही झाले तरी आपली वाट सोडायची नाही. तीच उद्या अनेक जण अनुसरणार असतात.
*तेव्हा बॅडपॅच आला तर येऊ द्या..*
*त्यालाही सांगा मी तुझ्याही स्वागतासाठी सज्ज आहे... !*
(मनाने खचलेल्या ज्ञात अज्ञात मित्रांसाठी...)