लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या, तर काही मार्गांवर रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. याचा थेट परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. खराब रस्त्यांमुळे पुणे विभागाच्या अनेक गाड्यांची अवस्था खराब झाली आहे. त्यांच्या देखभालीचा खर्चदेखील वाढला आहे. आधीच आर्थिक तोटा सहन करणाऱ्या एसटीला खराब रस्त्याचादेखील फटका बसत आहे. खराब रस्त्यामुळे एसटी ‘खड्ड्यात’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मागील महिन्यापासून पुणे विभागाची कोकणकडे जाणारी एसटी वरांधा घाट बंद असल्याने मार्ग बदलून जात आहे. जवळपास ३० ते ४० किमीचा जास्तीचा फेरा एसटीला घालावा लागत आहे. यामुळे तिकीट दरात वाढ झाली, तर प्रवाशांना जास्तीचा एक तासाचा प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती केली होती. मात्र, आता तोच रस्ता दुरुस्तीसाठी बंद केला असल्याने एसटीला पर्यायाने प्रवाशांना फटका बसला आहे.
बॉक्स १
ग्रामीण भागात फेऱ्या बंद
पुणे विभागात एकूण १३ आगार आहेत. त्यापैकी शिवाजीनगर वगळता सर्वच आगारांतील बहुतांश गाड्या रात्री मुक्कामी जाणे बंद आहे. यामागे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद हे एक कारण जरी असले तरीही रस्त्यावर पडलेले खड्डे हेदेखील यामागचे प्रमुख कारण आहे. फेऱ्या बंदमुळे होणारे नुकसान व खराब रस्त्यामुळे होणारे नुकसान, अशा दोन्ही प्रकारच्या नुकसानीला एसटी प्रशासनाला तोंड द्यावे लागत आहे.
बॉक्स २
खराब रस्त्यामुळे होते वाहनाचे नुकसान
खराब रस्त्यामुळे एसटीचे टायर कट होऊन खराब होणे, स्प्रिंगमधील मेनलीप खराब होणे, सस्पेन्शन, इंजिन खराब होणे, गीअर बॉक्समधील हायुझिंग खराब होणे आदी प्रकारचे नुकसान होते. पावसाळा संपल्यानंतर एसटी प्रशासन याचा आढावा घेते. शेडुल्ड मेन्टेनन्सबरोबर अचानक खराब होणाऱ्या गाड्यांचे प्रमाण आता वाढत आहे.
कोट :
भोरमार्गे महाडला जाताना वरांधा घाटातला रस्ता खराब झाल्याने आम्ही पर्यायी मार्गाने एसटी वाहतूक करीत आहोत. त्यामुळे प्रवासाचा वेळदेखील वाढला आहे, तसेच प्रवाशांना जास्तीचे तिकीटदेखील काढावे लागत आहे. रस्ता लवकर दुरुस्त झाला पाहिजे.
-ज्ञानेश्वर रनवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, पुणे विभाग