पुणे : शहरातील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली असून, त्यामुळे पुणेकरांना सर्दी, खोकला, धाप लागणे, डोळ्यांची जळजळ होत आहे. सध्या हवेच्या गुणवत्तेची पातळी सरासरी १६० इंडेक्सवर गेली आहे. जी अत्यंत धोकादायक आहे. हवेची गुणवत्ताही ५० पर्यंत चांगली असते. सध्या शहरातील पीएम १० चे प्रदूषण हे पातळीपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. अनेकांना या प्रदूषित हवेमुळे खोकला, सर्दी, छातीत दुखणे, धाप लागण्याचा त्रास होत आहे.
सध्या ऑक्टोबर हिटची जाणीव पुणेकरांना होत असली, तरी पहाटेच्या वेळी धुके पडत आहे. तसेच हवेत गारवाही जाणवत आहे. त्यामुळे दुपारी उन्ह आणि रात्री उष्णता, पहाटे धुकं अशा विचित्र हवामानामुळे पुणेकर आजारी पडत आहेत. त्यातच हवाही बिघडली आहे. हवेमध्ये प्रदूषक कणांची पातळी वाढली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, दम लागणे आदींमुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. शहरात वाहनांची प्रचंड संख्या वाढली आहे. त्यातून बारीक कण हवेत मिळत आहेत. तसेच बांधकाम क्षेत्रातील धुळही वाढत आहे. परिणामी सध्या प्रदूषित हवेचा श्वास पुणेकर घेत आहेत.
पीएम २.५ म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यदायी हवेचे जे निकष सांगितले आहेत, त्यामध्ये पुण्यातील हवा ही अत्यंत प्रदूषित आहे. पीएम २.५ हे चारपट अधिक प्रदूषित असल्याचे दिसून येत आहे. पीएम २.५ कण म्हणजे २.५ मायक्रोन आकाराचे सूक्ष्म प्रदूषक कण. ते हवेत तरंगत सहजपणे श्वासातून माणसाच्या शरीरात जाऊ शकतात. त्यांचा आकार हा केसाच्या रुंदीपेक्षा चाळीसाव्या भागाइतका सूक्ष्म असतो. हे कण ओझोन, नायट्रोजन ऑक्सिड , कार्बन डिओक्सिड , सल्फर डिओक्सिड , नायट्रेट, धूळ यांचे असतात. त्याने माणूस आजारी पडू शकतो. नेमके हेच कण हवेत सध्या वाढले आहेत.
पीएम १० कण म्हणजे काय ?
हवेत पीएम १० हे (१० मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाचे कण) कण घसा आणि नाकातून जाण्यासाठी आणि फुफ्फुसात प्रवेश करण्यासाठी पुरेसे लहान असतात. आपण एकदा श्वास घेतल्यावर, हे कण हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम करू शकतात आणि गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे पुणेकरांनी सध्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
पातळी किती हवी?
शहरांमध्ये हवेतील पीएम २.५ आकाराच्या प्रदुषकांची पातळी ६० मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर एवढी राखली जावी, असे निर्देश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. पण आता ही पातळी शिवाजीनगरमध्ये १८२ वर गेली आहे. शहरातील मुख्य भागाचे एवढे प्रदूषण वाढल्याने पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
परिसर - पीएम २.५ - पीएम १०
शिवाजीनगर : १८२ - २२९पाषाण हिल : ३७ - १०४
लोहगाव : ४४ - १६७हडपसर : ७८ - १४५
कोथरूड : ६६ - १३९
सकाळी हवेत अधिक प्रदूषणाचे कण आढळून येतात. त्यामुळे सकाळी फिरायला जाणं टाळून सायंकाळी जावे. या प्रदूषित हवेमुळे सर्दी, खोकला, घशात खवखव होणे, सूज येणे असा त्रास होतो. तर दीर्घकालीनमध्ये दम्याचा आजार, हृदयाचा आजार होऊ शकतो. कारण बारीक कण हे श्वासावाटे फुप्फुसात जाऊन ते हृदयापर्यंत जातात. त्याने ब्लॉकेज होतात. म्हणून ज्यांना दम्याचा त्रास असेल, त्यांनी मास्कचा वापर करावा.
- डॉ. स्वप्नील कुलकर्णी, फुप्फुसरोग तज्ज्ञ