पुणे : ‘माझीही गाडी काल चेक केली. मला याचा आनंद आहे आणि उपस्थित अधिकाऱ्यांना याबाबत प्रोत्साहनही दिले. त्यांनी जरूर सर्व चेक करावे. परंतु, उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांची बॅग तपासणे हे सुडाचे राजकारण आहे,’ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
खासदार सुळे यांच्या सहभागाने हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारासाठी बाईक रॅली आयाेजित करण्यात आली हाेती. त्यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. कात्रज तलावाजवळील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन सुप्रिया सुळे यांनी बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीत शिवसेनेचे वसंत मोरे, माजी उपमहापौर बंडू गायकवाड, योगेश ससाणे, दिलीप तुपे, प्रवीण तुपे, समीर तुपे, नीलेश मगर यांच्यासह या रॅलीत सहभागी झाले. कात्रज गावठाण, गोकुळनगर चौक, कान्हा हॉटेल चौक, साळवे गार्डन, कोंढवा बुद्रुक, साईनगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द या भागातून ही रॅली निघाली. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी सुप्रिया सुळे व प्रशांत जगताप यांच्याशी संवाद करीत आपल्या समस्या मांडल्या. सुळे यांनीही सर्वांचे गाऱ्हाणे ऐकून विकासाची हमी दिली व येत्या काळात प्रशांत जगताप यांच्या माध्यमातून परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास दिला.
ही लढाई वैचारिक
सुळे म्हणाल्या, "ही लढाई कौटुंबिक नसून, वैचारिक आहे. आम्ही अन्यायाविरुद्ध लढत आहोत. आमच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत. हे म्हणजे 'चोराच्या उलट्या बोंबा' असा प्रकार आहे. आमच्यावरील आरोप खरे असतील, तर आम्ही कोर्टामध्ये जाण्यासाठी तयार आहोत. हडपसरच्या विकासासाठी प्रशांत जगताप हेच योग्य पर्याय आहेत.