लोहगाव : पुण्यातील संगमवाडी येथे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांचा तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात स्वयंसेवक आणि भक्तांमध्ये हाणामारी झाली आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळ निर्माण झाला व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
संगमवाडी येथील निकम फार्ममध्ये जगदीश मुळीक फाउंडेशनद्वारे बागेश्वर बाबांचा तीन दिवस हनुमान कथा व सत्संगाचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाला भाविकांनी गर्दी केली आहे. पुणे व परिसरातून येणाऱ्या भक्तांना प्रवेशद्वारावरच सापत्न वागणूक मिळत असल्याचे कार्यक्रमस्थळी बोलले जात आहे. आयोजकांद्वारे शहरातील अनेक मान्यवरांना व्हीआयपी व व्हीव्हीआयपी पासेस देण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबाला जवळून पाहण्यासाठी व्हीआयपी कक्षाच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी झाली हाेती. अशाच प्रकारे ग्रेटर नोएडा येथील कार्यक्रमातसुद्धा बागेश्वर बाबाच्या बाउन्सर्सनी भक्तांना मारहाण केल्याची घटना घडली आहे, त्याचीच पुनरावृत्ती आज पुण्याच्या कार्यक्रमात झाली आहे.
पास असूनसुद्धा केली मारहाण
काही भक्तांकडे पास असूनसुद्धा त्यांना सोडले जात नाही, म्हणून स्वयंसेवकांशी हमरीतुमरी झाली. अशात प्रवेशद्वारावरच स्वयंसेवकाने भक्ताच्या कानशिलात लगावल्याने वातावरण चिघळले व त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. स्वयंसेवकाच्या अरेरावीमुळे हा प्रकार घडला असून, स्वयंसेवकांनी मारहाण केल्याचा उल्लेख उपस्थित काही स्त्रियांनी देखील केला. या प्रकाराचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेवटी पोलिसांच्या मदतीने हा प्रकार सामंजस्याने मिटविण्यात आल्याचे समजते.
विनापास प्रवेश घेतल्याने स्वयंसेवकांकडून अटकाव
ज्यांना व्हीआयपी पास दिल्या आहेत, त्यांच्यासोबत अनेक जण विनापास प्रवेश घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे स्वयंसेवकांकडून अटकाव करण्यात येत होता; पण या प्रकरणात पास असूनही सोडले जात नसल्याने प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याचे समजते. पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने प्रकरण मिटवून घेण्यात आले.
पुण्याच्या पूर्व भागातील एका नगरसेवकाकडे व्हीव्हीआयपी पास असूनदेखील सुरक्षारक्षक व स्वयंसेवकांनी त्यांना आतमध्ये जाण्यास अटकाव केला. शेवटी मुळीक यांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क केल्यानंतर त्यांना मंचाच्या मागील बाजूने प्रवेश देण्यात आला. - एक प्रत्यक्षदर्शी