पुणे: महानगरपालिका निवडणूक अवघ्या ३० दिवसांवर येवून ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांंंच्या निवडणूक प्रचाराला जोर आला आहे. प्रचार म्हटला की त्यासाठी विविध प्रकारचे साहित्य आवश्यकच़ विविध पक्षाचे झेंडे, टोपे, पगडी, राजकीय पक्षाचे चिन्ह तसेच स्टीकर, टी-शर्ट, उपरणे यांनी शहरातील बाजारपेठा सजल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रचारासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याची लगबग कार्यकर्त्यांकडून सरू झाली आहे.निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप- शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप संपलेले नाही. परिणामी उमेदवार याद्या जाहीर झाल्या नाहीत. परंतु, निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या काही उमेदवारांनी प्रचारासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी नोंदवून ठेवली आहे. तर पक्षाकडून आपल्याला तिकिट मिळेल अशी खात्री असणाऱ्या उमेदवारांकडून झेंडे, पक्षाचे चिन्ह आदी साहित्य खरेदी करून कार्यकर्त्यांना वाटले जात आहे. निवडणूकीसाठी चारचा प्रभाग झाल्याने इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठी भेटी घेण्यास सुरूवात केली आहे. प्रचारासाठी उपरणे घालून फिरण्याची नवी पद्धत सध्या रुढ होऊ लागली आहे़ त्यामुळे पक्षाचे चिन्ह असलेल्या उपरण्याला सर्वाधिक मागणी दिसून येत आहे़ पक्षाचे उपरणे, टी शर्ट परिधान करून इच्छुक उमेदवाराबरोबर कार्यकर्ते फिरत आहेत. त्यामुळे प्रभागात प्रचारासाठी फिरणारे विविध पक्षाचे कार्यकर्ते उठून दिसत आहेत.
साहित्य खरेदीची लगबग
By admin | Published: January 23, 2017 3:27 AM