पुणे : राहत्या घरी अनधिकृत बांधकाम केल्याचे प्रकरण नगरसेवक अविनाश बागवे यांना भोवले असून, न्यायालयाने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी न्यायालयाने १७ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्यानुसार अपिलात जाणार असल्याचे बागवे यांनी सांगितले.
पालिकेच्या २०१७ साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बागवे यांनी प्रभाग क्रमांक १९ ‘अ’मधून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत एकूण आठ उमेदवार एकमेकांसमोर होते. ही निवडणूक बागवे यांनी जिंकली होती. मनसेचे प्रतिस्पर्धी उमेदवार अॅड. भूपेंद्र शेडगे यांनी निवडणूक लढविली होती. उमेदवारी अर्जाच्या छाननी दरम्यान शेंडगे यांनी बागवे यांच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीविषयी हरकत नोंदविली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश नसल्याचे नमूद करीत ही हरकत फेटाळली होती.
त्यामुळे शेंडगे यांनी मुख्य लघुवाद न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने बागवे यांचे पद अपात्र ठरविल्याची माहिती शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यासंदर्भात बागवे म्हणाले की, लघुवाद न्यायालयाने निर्णय दिला असला तरी त्याला १७ जुलैपर्यंत स्थगितीदेखील दिली आहे. माझ्या पत्नीच्या नावाने घर आहे. या घराच्या दुरुस्तीसाठी पूर्वपरवानगी घेतली होती. अर्जदाराने न्यायालयाची दिशाभूल केली असून या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अर्ज करणार आहे.