पुणे : गतवर्षी ‘शांताबाई$$’ या गाण्याने मिरवणूक भलतीच गाजवली. यंदा मात्र या गाण्याचे गारूड काहीसे कमी होऊन त्याची जागा ‘बाई वाड््यावर या’, ‘पप्पी दे पारोला’, ‘चिमणी उडाली भुर्रर’ या द्विअर्थी गाण्यांसह ‘अरे दिवानो’, ‘अग अग पोरी फसलीस गं’ या रिमिक्स गाण्यांमुळे डीजेच्या तालावर मिरवणूक चांगलीच दणाणून सोडली. पोरी जरा जपून दांडा धर, नागोबा डुलाया लागला, बघतोय रिक्षावाला, ‘झिंगाट’, दुश्मन की देखो कैसे वाट लावली या गाण्यांनी मिरवणुकीत धूम केली. ‘बाई वाड्यावर या’,‘पप्पी दे पारोला’, ‘चिमणी उडाली भुर्रर’ या गाण्यांनी शेवटपर्यंत मिरवणूकीवर आपले वर्चस्व कायम ठेवले. आबालवृद्धांच्या तोंडी, मनात आणि नृत्यात हीच गाणी गाजत होती. या गाण्यांच्या प्रत्येक शब्दावर तरुण ठेका धरताना दिसले. ढोल-ताशांचा कडकडाट आणि डीजेच्या भिंती तरुणाईच्या जल्लोषात भर घालत होत्या. ‘झिंगाट’ गाण्यावर तरुणाई देहभान हरपून नाचत होती. गाण्यातील इतर शब्द कळत नसले, ऐकू येत नसले तरी गाण्यांच्या सुरावर आणि तालावरच सर्व जण ठेका धरताना दिसले. ही गाणी सर्वांनाच नृत्य करायला भाग पाडत होती. मिरवणुकीत सहभागी न झालेले लोकही रस्त्याच्या बाजूला उभे राहून नृत्याचा आनंद घेत होते. विविध रस्त्यांवर डॉल्बीच्या तालावर नृत्याचा हा धांगडधिंगा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कायम होता. डीजेच्या पावलावर थिरकणारी ही पावले प्रत्येकजण कॅमेऱ्यात बंदिस्त करीत होता. काही जण हे क्षण कॅमेऱ्यात रेकॉर्ड करीत होते. मिरवणुकीतील हा जल्लोष आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी अनेक जण सरसावले होते. नृत्यात महिलांचा सहभाग असलेल्या ठिकाणी मंडळांचे कार्यकर्ते साखळी करून उभे होते. त्यामुळे तरुणी, महिलांभोवती जणू संरक्षक कवच निर्माण करण्यात आले होते.
‘बाई..’ अन् ‘पप्पी दे’ने शांताबाईला टाकले मागे
By admin | Published: September 17, 2016 1:24 AM