पुणे : बीआरटी मार्गावरील सुरक्षा रक्षकांशी वाद घालून, काही वेळा हाणामारीवर उतरून शेकडो चारचाकी चालक व दुचाकीस्वार संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यानच्या बीआरटी मार्गात बेकायदेशीरपणे घुसत आहेत. मात्र, स्वत:च्या जिवाबरोबरच बीआरटी घुसखोर इतरांचा जीवही धोक्यात घालत आहेत. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा सुरक्षारक्षकांकडून केली जात आहे.सार्वजनिक वाहतूक जलदगतीने व्हावी, या उद्देशाने शहरातील विविध भागात बीआरटी मार्ग सुरू करण्यात आले; तसेच बीआरटीतून इतर वाहनांनी ये-जा करू नये म्हणून बीआरटी मार्गावर सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, सुरक्षा रक्षकांना न जुमानता वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक दुचाकी व चारचाकीचालक बीआरटी मार्गातून वाहने घेऊन जातात. त्यात बीआरटी परिसराजवळ राहणारे काही नागरिक दररोज या मार्गातून जात आहेत. तसेच बीआरटी घुसखोरांना थांबविण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला शिव्या दिल्या जातात. आमच्या अंगावर धावून हाणामारीची भाषा करतात, असे बीआरटी मार्गातील सुरक्षा रक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बीआरटी मार्गाचे सुरक्षारक्षक गोरखनाथ जंबे म्हणाले, आमच्याकडे कोणतेही अधिकार नसल्याने बीआरटीतील घोसखोरांवर कारवाई करता येत नाही. त्यांना थांबविले तर ते आमच्याशी वाद घालतात. शिव्या देऊन हाणामारीवर उतरतात. सादल बाबा चौकाजवळून अनेक वाहने बीआरटीत घुसतात. संबंधितांच्या वाहनांचे नंबर आम्ही कागदावर लिहून ठेवतो. परंतु, हातातील कागद केवळ १५ मिनिटांतच संपतो. एवढी वाहने या मार्गातून जातात.कागद संपल्यानंतर आम्ही हातावर क्रमांक लिहून ठेवतो. दररोज लिहून ठेवलेले क्रमांक आमच्या वरिष्ठांकडे देतो. मात्र, एकाही वाहन चालकावर अद्याप कारवाई झाली नाही. त्यामुळे दररोज त्याच-त्याच क्रमांकाच्या चारचाकी व दुचाकी गाड्या बीआरटी मार्गातून जाताना दिसून येतात. तसेच या मार्गात एका ठिकाणी अचानक वळण असल्याने या ठिकाणी अपघात होतात.
बीआरटीमध्ये घुसखोरांचा जिवाशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:37 AM