लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : व्यावसायिकाकडून तीन कोटी रुपयांची जमीन नावावर करून घेतल्यानंतर उर्वरित ५८ गुंठे जमीन बळकावण्यासाठी त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी व मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. न्यायाधीश आर. के. बाफना-भळगट यांनी हा आदेश दिला.
नितीन मनोहर हमने (वय ३१, कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. यातील आरोपी अॅड. दीप्ती काळे हिचा ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नीलेश शेलार (रा. कोथरूड) आणि आणखी दोन आरोपींविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार पेठेमधील ३३ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. अॅड. काळे हिने फिर्यादीच्या पतीबरोबर जवळीक साधल्यानंतर तिने फिर्यादीच्या पतीस बांधकाम व्यवसायासाठी ३५ लाख रुपये दिले होते. त्या बदल्यात त्यांच्या पतीकडून कोयाळी, मरकळ (ता. खेड) येथील तीन कोटी रुपयांची ४२ गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली होती. तर उरलेली ५८ गुंठे जमीन नावावर करून दे नाही तर तुझ्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली. यानंतर नीलेश व नितीन यांनी फिर्यादीच्या पतीला हाताने मारहाण करून धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हमने याने केलेल्या जामिनाच्या अर्जास सरकारी वकील किरण बेंडभर यांनी विरोध केला. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपींनी बंदुकीचा वापर केला आहे, या सर्वांचा तपास सुरू आहे, त्यामुळे जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद अॅड. बेंडभर केला.