आळेफाटा येथील माऊली मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील गवंडवाडी शाखेचे अध्यक्ष विष्णू रामचंद्र भागवत, बोरी येथील (ता. जुन्नर) संतोष सुदाम कोरडे, सुरेश सीताराम घंगाळे, निलेश जनार्दन कुंभार, डॉ विशाल मुरलीधर सुपेकर या संचालकांनी ३ कोटी ९३ लाख ८१ हजर ८८३ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बाळासाहेब सावकार म्हस्के यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माउली मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी अध्यक्ष विष्णू रामचंद्र भागवत याला २५ नोव्हेंबर २०२० रोजी अटक केली होती. तर संचालक संतोष सुदाम कोरडे, सुरेश सीताराम घंगाळे, निलेश जनार्दन कुंभार, डॉ विशाल मुरलीधर सुपेकर यांना दि १९ नोव्हेंबर २०२०ला अटक केली. हे सर्व पाचही संचालक न्यायालयीन कोठडीत होते.
शनिवारी(दि. ६) पाच पैकी चौघांनी जामिनासाठी राजगुरूनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांच्या कोर्टासमोर सुनावणी झाली. सरकारच्या बाजूने सरकारी वकील अॅड. प्रसन्न जोशी यांनी बाजू मांडली. न्यायाधीश एन के ब्रम्हे यांनी या प्रकरणातील संतोष सुदाम कोरडे, सुरेश सीताराम घंगाळे, निलेश जनार्दन कुंभार, डॉ विशाल मुरलीधर सुपेकर यांचे जामीन अर्ज फेटाळले.
सरकारी वकील अॅड. प्रसन्न जोशी यांनी सांगितले, संबंधीत आरोपींवर सुरुवातीला आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तेंव्हा ३ कोटी ९३ लाख रुपये फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांच्या चौकशी नंतर ५४ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपीना अटक केली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. शनिवारी दि ६ मार्च रोजी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी पक्षाकडून जोरदार हरकत घेतली होती. त्यांचा जामीन मेहरबान कोर्टाने फेटाळला आहे.