पुणे : कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. मोबाईलवर कॉल करून नाकाबंदीसाठी हजर राहण्यास सांगितल्याच्या कारणावरून पोलीस शिपायाने पोलीस हवालदारास ¦गज तसेच लाथांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी शिपायाचा अटकपूर्व जामीन अर्ज जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने फेटाळला.
सूरज जालिंदर पोवार (नेमणूक भोसरी वाहतूक विभाग पिंपरी-चिंचवड) असे अटकपूर्व जामीन फेटाळलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलीस हवालदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दापोडीतील हॅरीस पुलावर २२ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली होती.
पोलीस मुख्यालयात नेमुणकीस असलेले पोलीस हवालदार यांना भोसरी पोलीस ठाणे अंतर्गत बंदोबस्तासाठी दापोडीतील हॅरीस पूल येथे नाकाबंदी पॉईंटवर नेमले होते. याच ठिकाणी सूरज पोवार यालाही नाकाबंदीसाठी नेमले होते. पोवार हा २२ एप्रिल रोजी रात्री १०.३० पर्यंत बंदोबस्तासाठी न आल्याने फिर्यादींनी त्याला कॉल केला तसेच बंदोबस्तासाठी येण्याबाबत सांगितले. त्यावरून दोघांत शाब्दिक वाद झाले. त्यानंतर पोवारने पुलावर येत फिर्यादीच्या डाव्या पायावर गजाने मारहाण केली. फिर्यादी हे जमिनीवर कोसळल्यानंतर पोवारने फिर्यादीच्या तोंडावर बुटाने लाथा मारल्या. त्यामध्ये फिर्यादींच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.
पोवार याला कायद्याचे ज्ञान असूनही त्याने गंभीर गुन्हा केला आहे. त्याला अटक करून पुढील तपास करण्यासाठी त्याचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप गहलोत यांनी केली असता ती न्यायालयाने मान्य केली.