पुणे : पतीचे निधन झाल्यानंतर घर नावावर करून घेण्यासाठी आईला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात मुलांसह पाच जणांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
मुलगा अहेमद अब्बास अली नईमाबादी, दीर नादीर ऊर्फ अब्दुल हसन नईमाबादी आणि दोन नणंदाना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर प्रमुख आरोपी असलेला मुलगा हुसेन अब्बास अली नईमाबादी याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी यापूर्वीच १५ हजारांचा नियमित जामीन दिला आहे. सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी १५ हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन चौघांना मंजूर केला आहे. प्रथमदर्शनी तब्बल सात महिने विलंबाने एफआयआर दाखल केल्याचे दिसून येत आहे. ४९८ (अ) सह लावलेले सर्व कलम जामीन पात्र असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
सर्वांनी ॲॅड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. ॲॅड. घुगे यांना ॲॅड. सचिन जगताप आणि ॲॅड. सिरसीकर यांनी सहकार्य केले. ही घटना १५ जानेवारी रोजी घडली. ९ ऑगस्ट रोजी म्हणजे तब्बल सात ते आठ महिने विलंबाने एफआयआर दाखल झाला. ज्या घरावर वाद आहे. ते घरच मुळात मुलाच्या नावावर आहे. राजकीय भावनेने एफआयआर दाखल झाला. चौघांनाही मारहाणीचे कलम लागू होत नाही. त्यावेळी नादीर हा पुण्यात नव्हता. तो हैदराबादला गेल्याचे विमान तिकीट सादर करण्यात आले. त्यामुळे सर्वांना अटकपूर्व जामीन देण्याची मागणी करण्यात आली.
याबाबत ५७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. जानेवारीमध्ये त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या एकट्या राहत असत. घटनेच्या दिवशी सर्व जण तिच्या घरात घुसले. घर नावावर करून देण्याच्या नावावर धिंगाणा घातला. त्यांना घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले होते.