पुणे : रुग्णालय सुरू करण्यासाठी राज्य शासनाने अधोरेखित केलेली योग्य ती कागदपत्रे नसतानाही कोविड केअर सुरू करणाऱ्या एका डॉक्टरचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. आर. जगदाळे यांनी फेटाळला.
निखिल विजय इंगळे (रा. शिक्रापूर) असे या डॉक्टरचे नाव आहे. या प्रकरणी तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून इंगळे सह चौंघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी शिक्रापूर येथे आधार नावाचे कोविड केअर सेंटर सुरू केले. पण मुळात कोविड आजारासंदर्भातील उपचारासाठी एखादे रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रमाणपत्रे असणे गरजेचे आहे. परंतु, त्यांच्याकडे ती नसतानाही कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू होते, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. इंगळे याच्या जामीन अर्जास सरकारी वकील निवेदिता काळे यांनी विरोध केला.