पुणे : तब्बल २० किलो किमतीचा गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा आरोप असलेल्याला सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांनी ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
सचिन मोतीराम मंजुळे (वय 30, रा. अनसारवाडी, ता. निलंगा, जि. लातूर) असे त्याचे नाव आहे. 19 किलो 866 ग्रॅम सुमारे दहा लाख रुपये किमतीचा विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याने ॲड. सी.बी.कचरे, ॲड. खंडेराव टाचले आणि ॲड. मनीष मगर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. 30 मार्च 2018 रोजी गहुंजे गावाजवळ स्कोडा गाडीतून या गांजाची वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांना पाहून दोघेजण पळून गेले. त्या गाडीचा चालक असल्याचा आरोप मंजुळे याच्यावर आहे. त्याच्यासह तिघांवर शिरगाव परंदवाडी चौकी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज केला. त्याचे नाव एफआयआरमध्ये नाही. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही. तो गाडी चालवत असल्याचा कोणताही पुरावा नाही. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी ॲड. कचरे आणि ॲड. टाचले यांनी केली.
------------------------