लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ठेवीदार संरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांची पत्नी हेमंती यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ‘डीएसके’ यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. नाईक यांनी हा निकाल दिला. परंतु, केवळ एकाच खटल्यात हेमंती कुलकर्णी यांना जामीन मंजूर झाला असल्याने त्यांची कारागृहातून मुक्तता होणार नाही.
यापूर्वीही डीएसके आणि हेमंती कुलकर्णी यांचा जामीन अर्ज ३० नोव्हेंबर २०१९ साली येथील सत्र न्यायालयाने फेटाळला होता. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर डीएसके, त्यांची पत्नी हेमंती आणि सई वांजपे यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. डीएसके यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांच्यासह काहींना या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला. तर डीएसके दाम्पत्यांचा जामीन नाकारण्यात आला होता. जामिनासाठी हेमंती कुलकर्णी यांनी पुनश्च आशुतोष श्रीवास्तव यांच्यावतीने अर्ज केला. हेमंती या गेल्या साडेतीन वर्षांपासून तुरुंगात आहे. त्यांना शिक्षा झाल्यास त्यासाठी असलेल्या तरतुदीनुसार त्यांनी अर्धी शिक्षा भोगली आहे. त्यांचे वय आणि कोरोना स्थितीचा विचार करता हेमंती यांना जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. श्रीवास्तव यांनी केला.
डीएसके, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांच्या विविध कंपन्यांवर ठेवीदारांची फसवणूक व इतर विविध कलमांनुसार देशात सुमारे ४५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पुणे, सोलापूर, नाशिक आदी विविध भागांमधून त्यांच्यावरचे जवळपास साडेतीनशे ते चारशे वॉरंट प्रलंबित आहेत. हेमंती कुलकर्णी यांना केवळ एमपीआयडी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात जामीन मंजूर झाला. त्यामुळे त्यांची कारागृहातून मुक्तता होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.