शालेय विद्यार्थिनीची छेडछाड खटल्यातील शिक्षा झालेल्या आरोपीला जामीन; उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 09:02 PM2021-05-03T21:02:25+5:302021-05-03T21:02:50+5:30
पीडित विद्यार्थीनी विश्रांतवाडी येथील एका शाळेत शिक्षण घेत होती. आरोपी निकम हा पिडित मुलीला शाळेत जाताना, क्लासला जाताना पाठलाग करायचा....
पुणे : शालेय विद्यार्थीनीची छेडछाड केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
अमोल अशोक निकम (वय २५, रा. शंकरराव जाधवनगर, येरवडा) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी ४ वर्षे सश्रम कारावास व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा ठोठावल्यापासून अमोल निकम हा येरवडा कारागृहात २७ जानेवारी २०२१ पासून शिक्षा भोगत होता.
आरोपीने सत्र न्यायालयाच्या शिक्षेच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अॅड. प्राजक्ता मिलिंद पवार व अॅड. ऋषिकेश केशव करवंदे यांच्या वतीने अपील दाखल करुन दाद मागितली होती. अपील दाखल करुन द्यावे व अपिलाचा निकाल लागेपर्यंत आरोपीला जामिनावर सोडण्याची विनंती केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी ही विनंती मान्य करुन आरोपीला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कारागृहातून सोडण्याचा आदेश व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या सुनावणीत दिले व आरोपीचे अपील दाखल करुन घेतले.
पीडित विद्यार्थीनी विश्रांतवाडी येथील एका शाळेत शिक्षण घेत होती. आरोपी निकम हा पिडित मुलीला शाळेत जाताना, क्लासला जाताना पाठलाग करायचा. ९ जुलै २०१७ रोजी अमोल याने पिडित मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केला. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली होती. सत्र न्यायालयात आरोपीने केलेला गुन्हा सरकार पक्षाने शिद्ध केल्याने त्याला ४ वर्षे कारावासाची व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
अॅड. प्राजक्ता पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर युक्तीवाद केला की, आरोपी शिक्षा होईपर्यंत जामीनावर होता. खटल्याची सुनावणी सुरु असताना आरोपीच्या हातून कोणतेही गैरकृत्य घडलेले नाही. त्याने जामीनाच्या सर्व अटी शर्तींचे पालन केले आहे. या अपिलाचा निकाल लागेपर्यंत आरोपीला जामीनावर मुक्त केल्यास आरोपी सर्व अटी शर्तींचे पालन करील, असा युक्तीवाद अॅड. प्राजक्ता पवार यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन उच्च न्यायालयाने आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला.