पुणे: भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या स्नानगृह आणि शयनकक्षात स्पाय कॅमेरा लावणा-या सुजित आबाजीराव जगताप या डॉक्टरला ३० हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला.
डॉक्टरविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगतापला जर जामिनावर सोडले तर तो तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल. तसेच एका हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याने तो तक्रारदाराला धमकावण्याची शक्यता आहे. त्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा तो गैरफायदा देखील घेऊ शकतो. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज नामंजूर करावा असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. मात्र, आरोपीच्या वकिलांनी सांगितले की ज्या कलमान्वये आरोपींवर दोषा - रोप आहे तो गुन्हा जामीनपात्र आहे.
गूणदोषानुसार खटल्याच्या निकालात बराच कालावधी लागणे शक्य आहे. त्याला जामिनीवर न सोडल्यास त्याच्या रोजगार धंद्याचे नुकसान होईल. तो पुण्याचा कायमस्वरूपी रहिवासी असून, तो फरार होणार नाही. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर जगतापला न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याच्या बाजूने अँड सुधीर शाह, अँड सारथी पानसरे, अँड तेजलक्ष्मी धोपावकर आणि अँड सूरज इंगले यांनी काम पाहिले.
काय आहे प्रकरण?
सुजित आबाजीराव जगताप हा मेंदूविकारतज्ञ आहे. भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये तो लेक्चरर आहे. त्यातून त्याची महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांशी चांगली ओळख झाली. त्याने त्यांच्याशी बोलताना नकळतपणे त्यांच्या खोलीच्या चावीचे ठसे घेतले. त्याने त्यांच्या खोलीची बनावट चावी तयार करून घेतली. महिला डॉक्टर हॉस्पीटल असल्याचे पाहून त्याने बनावट चावीद्वारे खोली उघडून त्यांच्या स्नानगृह व शयनकक्षात कॅमेरा असलेले बल्ब लावले होते. महिला डॉक्टरांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती.