पुणे : भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. आरोपींनी या गुन्ह्याशी साधर्म्य असलेला गुन्हा करण्याचा प्रयत्न पुन्हा करता कामा नये, अन्यथा जामीन रद्द करण्यात येईल. तसेच तपासात त्यांनी अडथळा आणू नये आणि तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करावे याच अटींवर सत्र न्यायाधीश आर. के बाफना-मळगट यांनी त्यांना जामीन मंजूर केला आहे.
विकी क्षीरसागर, मनोज पाटाेळे, महेश आगलावे, निखिल राजू मोहिते आणि राहुल दत्तू शेडगे अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी धीरज रामचंद्र घाटे (वय ४६, रा. स्नेहनगर, वृंदावन) यांनी फिर्याद दिली आहे. नवी पेठेतील सॅफ्रॉन हॉटेलमध्ये दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला होता. विकी क्षीरसागर याचा भाऊ राकेश क्षीरसागर याला आगामी पुणे महापालिका निवडणुकीत सहज निवडून येता यावे, यासाठी धीरज घाटे यांच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घाटे यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर गुन्हा दाखल होऊन, आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तिघांकडे तपास केला असता, त्यांनी खुनाचा कट रचल्याची कबुली दिली. त्यानंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली. या पाच आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकिलांनी जामिनाला विरोध केला. आरोपींच्या बाजूने ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार आणि ॲड. दिग्विजय ठोंबरे यांनी बाजू मांडली. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाचे उदाहरण देत काही अटींवर जामीन मंजूर केला जाऊ शकतो, असे न्यायालयाला सांगितले. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पाच जणांना जामीन मंजूर केला. मात्र दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत आरोपींनी विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे आठवड्यातील दर सोमवारी सकाळी ११ ते २ या वेळेत हजेरी लावावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
...