पुणे : अकरा वर्षांच्या मुलाला २०-२२ कुत्र्यांसमवेत डांबून ठेवण्याचा आरोप झालेल्या आई-वडिलांना मंगळवारी जामीन मिळाला. न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी प्रत्येकी १५ हजार रुपये व एक जामीनदार द्यावा या अटींवर हा जामीन मंजूर केला आहे.
एक दाम्पत्याने घरात २०-२२ भटकी कुत्रे पाळून मुलालाही त्या कुत्र्यांसमवेत ठेवले. त्यामुळे मुलाचे वर्तन कुत्र्याप्रमाणे झाले आहे, अशी अतिरंजित माहिती पसरवून हे प्रकरण सनसनाटी केले असल्याचा युक्तिवाद ॲड. असीम सरोदे यांनी न्यायालयात केला. तसेच कुत्र्यांचा छळ झाला असेल तर प्राण्यांप्रति क्रूरता प्रतिबंध कायदा १९६० मधील कलम ११ नुसार गुन्हा का नोंदवला नाही?, कुत्र्यांसमवेत काेंबून ठेवून मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न असता तर मुलाला जखमा झाल्याचे वैद्यकीय इन्जुरी सर्टिफकेटवर का दिसत नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. चुकीच्या कलामांखाली हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, कोंढवा पोलीस ठाण्याने दाखल केलेल्या गुन्ह्यात आई-वडिलांना जामीन देण्यात यावा, अशी मागणी केली. याचे कामकाज ॲड. सरोदे यांच्यासह ॲड. अजित देशपांडे, ॲड. अक्षय देसाई व ॲड. तृणाल टोणपे, ॲड. प्रेरणा कांबळे यांनी पाहिले.
पोलिसांना हाताशी धरून प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या एका संघटनेने ही खोटी केस दाखल केली. पाळीव कुत्रे व मुलगा यांना घरी एकत्र ठेवले म्हणून आई-वडिलांवर नोंदवण्यात आला. कुत्रे, मुलगा व ते आई-वडील मागील अडीच वर्षांपासून एकत्र राहतात. प्रत्यक्षात अकराच कुत्रे असताना २२ कुत्रे असल्याचे खाेटे पसरविण्यात आले. कुत्रे ताब्यात घेतले तेव्हा पंचनामा केला नाही, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यावर न्यायाधीशांनी सरकारी वकील बोंबटकर यांच्याकडे पंचनामा का केला नाही? कुत्र्यांची मोजणी करता येत नाही का?, प्रत्यक्ष ११ कुत्रे असताना गुन्ह्यात २२ कुत्रे असे का नमूद केले, असे प्रश्न विचारत पंचनामा दाखल न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आई-वडिलांना मुलाचा ताबा मिळावा म्हणून बाल कल्याण केंद्राकडे अर्ज करणार असल्याचेही ॲड. अक्षय देसाई व ॲड. अजित देशपांडे यांनी सांगितले.