पुणे : न्यायालयातील खटला रद्द करण्यासाठी न्यायाधीश मॅनेज करून निकाल बाजूने लावण्यासाठी ५० हजार रुपये स्वीकारलेल्या महिलेला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला .
विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. विशेष म्हणजे या प्रकरणात न्यायाधीशाचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय २९, रा. तळेगाव) असे जामीन झालेल्या महिलेचे नाव आहे. तिने ॲड. सुधीर शहा, ॲड. सुहास कोल्हे आणि ॲड. राहुल भरेकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना जतकर यांचा गुन्हात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. १३ जानेवारी रोजी किवळे, ता. हवेली येथे ही घटना घडली. वडगाव मावळ तालुक्यातील इंदूरी येथील ३२ वर्षीय व्यक्तीने याबाबत पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादी हे कडजई माता दूध संकलन मंडळाचे अध्यक्ष आहेत. दूध संकलन करून अमोल डेअरीला देण्यात येत असे. फिर्यादी आणि भावाच्या विरोधात अमोल डेअरीने केस दाखल केली आहे. तुम्हाला आणि भावाला अटक होणार आहे. ही केस रद्द करण्यासाठी न्यायाधीश मॅनेज करण्याच्या नावावर लाच मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी शुभावरीला १४ जानेवारी रोजी अटक केली. तिने न्यायालयीन कोठडीत असताना ॲड. सुधीर शहा, ॲड. सुहास कोल्हे आणि ॲड. राहुल भरेकर यांच्यामार्फत केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला.