लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लग्न होऊन सहा वर्षांच्या मुलाचा बाप असतानाही अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे. कुणाल बाळू लोंढे (वय २५, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे त्याचे नाव आहे. १५ वर्षीय मुलीच्या आईने याबाबत लोणावळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. रंगकामासाठी जात असल्याने लोंढे आणि त्या मुलीची ओळख झाली. त्याने या मुलीला लग्नासाठी मागणी घातली. त्यास फिर्यादीने नकार दिला. त्यामुळे ३० नोव्हेंबर २०१६ रोजी लोंढे याने लोणावळा येथून त्या मुलीला पळवून नेले. तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी लोंढे याला पोलिसांनी अटक केली आहे.आरोपीने त्या मुलीला हिंजवडी भागात चार महिने नेऊन ठेवले होते. त्यावेळी तिच्यावर बलात्कार केला. वैद्यकीय पुराव्यावरून तिच्यावर अत्याचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. ती मुलगी हिंजवडी भागात होती. त्यावेळी लोंढे याचे लग्न झाले असून, त्याला सहा वर्षांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी त्या मुलीने याबाबत लोंढे याला विचारणा केली. त्यावेळी लोंढे याने तिला मारहाण केल्याचे डॉक्टरांजवळ दिलेल्या जबाबात तिने सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. त्यामुळे जामीन मिळाल्यास लोंढे पुराव्यामध्ये छेडछाड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळावा, असा अॅड. बोंबटकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला.
बलात्कारप्रकरणी तरुणाचा जामीन फेटाळला
By admin | Published: June 30, 2017 3:59 AM