पुणे : रांजणगाव येथील बनावट चलनी नोटांचे गोडाऊन दाखवितो असे सांगत पोलिसांकडून १ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणात एकाला न्यायालयाने ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. साक्षीदारांवर दबाव न आणणे आणि सुनावणीच्या प्रत्येक तारखेस हजर राहण्याच्या अटीवर सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी हा आदेश दिला आहे.
सिकंदर परमेश्वर (वय ३२, रा. मुंबई) असे त्याचे नाव आहे. त्याने ॲड. भालचंद्र पवार, ॲड. किरण रासकर, ॲड. चंद्रशेखर भुजबळ यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात आणखी तिघांवर शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. दहशतवादविरोधी कक्ष पुणे ग्रामीणचे पोलीस शिपाई किरण कुसाळकर यांनी याबाबत फिर्याद दिली. २२ एप्रिलला पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने रांजणगाव येथे असलेले बनावट नोटांचे गोडाऊन दाखविण्याचे सांगून कळंबोली, नवी मुंबई येथे पोलिसांकडून एक लाख रुपये स्वीकारले. तेथून कारच्या पाठीमागे पोलिसांना येण्यास सांगितले. रांजणगाव येथे गाडी न थांवविता गाडीचा वेग वाढवून तो निघून गेला. त्यावेळी निमोणे येथे गाडी अडवून त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला. त्याने हा गुन्हा केलेला नाही. प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी ॲड. भालचंद्र पवार, ॲड. किरण रासकर आणि ॲड. चंद्रशेखर भुजबळ यांनी केली.