पुणे : घराचा दरवाजा लोखंडी पहारेने उचकटून आत प्रवेश करीत दरोडा टाकून १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी मोक्कांतर्गत अटकेत असलेल्या एका सराईताचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी फेटाळून लावला आहे.
सागर याद्या पवार (वय २३, रा. काष्टी) असे जामीन अर्ज फेटाळण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आणखी अकरा जाणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या घरात झोपलेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा लोखंडी पहारेने उचकटून घरात प्रवेश करून फिर्यादी यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने आणि ४० हजार ४०० रुपये असा १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. त्यानंतर गुन्ह्यातील साक्षीदार यांना दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पवारने जामिनासाठी केलेल्या अर्जाला विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. आरोपी हा सराईत असून, त्याच्यावर दौंड आणि यवत येथे दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. जामीन मिळाल्यास तो फिर्यादींसह साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळावा, असा युक्तिवाद वकिलांनी केला.