पुणे : सात गुन्हे दाखल असलेल्या आणि तडीपाराचा आदेश डावलून शहरात येऊन दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईताचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अजय चंद्रकांत विटकर (वय १९, रा. वडारवाडी) असे त्याचे नाव आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. परदेशी यांनी हा आदेश दिला.
दि. ९ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अजय हा चोरीची दुचाकी घेऊन फिरत असताना बाणेर परिसरात पोलिसांना आढळून आला. या वेळी त्याला शहरात येण्यासाठी न्यायालय अथवा पोलीस उपायुक्त यांची पूर्वपरवानगी घेतली आहे का? अशी विचारणा केली असता, त्याने परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. तसेच, त्याकडील दुचाकीसंदर्भात चौकशी केली असता त्याबाबत समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यानंतर ही दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दुचाकी जप्त करत अटक करण्यात आली. याबाबत बचाव पक्षाच्यावतीने जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यास सहाय्यक सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी विरोध केला. अजय हा सराईत गुन्हेगार आहे. तडीपारीचा आदेश डावलून तो शहरात दुचाकी चोरी करीत होता. त्याविरोधात या स्वरूपाचे आणखी सात गुन्हे दाखल आहेत. त्याला जामीन मंजूर झाल्यास तो या स्वरूपाचे गुन्हे पुन्हा करण्याची शक्यता आहे. तसेच, या प्रकरणातील साक्षीदारांना धमकाविण्यासह तो फरार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा युक्तिवाद अॅड. मुरळीकर यांनी केला. तो न्यायालयाने मंजूर करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
--------------------------------------------------------------------------