पुणे : नाकाबंदीसाठी हजर राहण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीत सहकारी हवालदाराला मारहाण करून जखमी करणाऱ्या पोलीस शिपायाला न्यायालयाने जामीन मंजूर केला. पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे आणि तपासास सहकार्य करण्याच्या अटीवर प्रथमवर्ग अधिकारी डी. ए. दरवेशी यांनी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा आदेश दिला आहे.
सूरज जालिंदर पोवार असे जामीन मिळालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याने ऍड. विजयसिंह ठोंबरे, ऍड. अभिजित सोलनकर आणि ऍड. अक्षय वाडकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्याविरोधात भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. ही घटना दापोडीतील हॅरिस पुलावर २२ एप्रिलला घडली.
लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलिसांच्यावतीने शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयात नेमुणकीस असलेले पोलीस हवालदार यांना भोसरी पोलीस ठाणेअंतर्गत बंदोबस्तासाठी दापोडीतील हॅरिस पूल येथे नेमण्यात आले होते. याच ठिकाणी पोवार यालाही नेमले होते. पोवार हा २२ एप्रिलला रात्री साडेदहा पर्यंत बंदोबस्तासाठी न आल्याने फिर्यादींनी त्याला फोन केला व बंदोबस्तासाठी येण्याबाबत सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर त्याने फिर्यादीला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.