पुणे : छायाचित्रण व्हायरल करण्याची, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत लक्ष्मी रस्त्यावरील नामांकित सराफाला 50 कोटीची खंडणी मागीतल्या प्रकरणात दोघांचा जामीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.मुजुमदार यांनी फेटाळला. रूपशे ज्ञानोबा चौधरी (वय-45) आणि आशिष हरिश्चंद्र पवार (वय-27) अशी त्या दोघांची नावे आहेत. चौधरी याचा चौथ्यांदा, तर पवार याचा दुसऱ्यांदा जामीन फेटाळण्यात आला आहे. दहा मार्च रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. राजश्री कदम यांनी बाजू मांडली. तर, फिर्यादीतर्फे अॅड. पुष्कर दुर्गे यांनी लेखी म्हणणे सादर करत जामिनाला विरोध केला होता. राष्ट्रवादीचे निलंबित नेते मंगलदास बांदल यांच्यासह रमेश रामचंद्र पवार (वय-32), संदेश वाडेकर यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. बांदल यांना जामीन मिळाला आहे. दत्तवाडी पोलिसांनी तपास करून या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. जामीन मिळाल्यास दोघे साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. पुढील न्यायालयीन सुनावणीस हजर न राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे दोघांचा जामीन फेटाळण्याची मागणी अॅड. कदम यांनी केली. फिर्यादीच्या वतीने पुष्कर दुर्गे काम पाहिले.
पुण्यातील नामांकित सराफाला खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 6:01 PM