पुणे : उंड्री भागात घर मिळवून दिल्यानंतर ब्रोकरेजचे पैसे न दिल्याने नोकरीनिमित्त आलेल्या लष्करी अधिकाऱ्याच्या मुलीला शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणात महिला एजंट आणि तिच्या साथीदाराला जामीन झाला आहे. लष्कर न्यायालयाने हा जामीन दिला आहे.
याबाबत 34 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार महिलेसह दीपक शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्या दोघांना जामीन मिळाला आहे. बचाव पक्षातर्फे ॲड. बिपीन पाटोळे, ॲड. भूपेंद्र गोसावी, ॲड. कुलदीप पाटील, ॲड. मनोज चौधरी यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. ती तरुणी काही दिवसांपूर्वी पुण्यात आली होती. तिचे वडील कर्नल आहेत. तिला दोघांनी उंड्री भागात राहण्यासाठी घर मिळवून दिले होते. त्या बदल्यात सात हजार रुपये देण्याचे ठरले होते. ते मागण्यासाठी दोघे १५ जून रोजी घरी गेले होते. पैसे न दिल्याने फिर्यादीला मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.