पुणे : व्यापाऱ्याचे दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करून त्याचा खून केल्या प्रकरणात मोक्काअंतर्गत अटक असलेल्या तिघांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी फेटाळला.
सुनील गायकवाड (वय ४९), अजिंक्य धुमाळ (वय २१), प्रीतम आंब्रे (वय ३६) अशी जामीन अर्ज फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांनी व्यावसायिक चंदन शेवनी (वय ४८) यांचा खून केला होता. याबाबत शेवनी यांच्या भावाने फिर्याद दिली आहे. दि. ४ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत पुणे आरटीओ कार्यालय व पांडेगाव तालुका लोणंद भागात ही घटना घडली.
४ जानेवारीला शेवनी यांची कार आरटीओ परिसरात आढळून आली होती. मात्र ते सापडले नाहीत. त्यानंतर ५ जानेवारीला खंडाळा तालुक्यातील पाडेगाव परिसरात त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या मृतदेहाशेजारी सापडलेल्या चिठ्ठीत २ कोटी दिले नाही म्हणून मरावे लागले, या आशयाचा मजकूर लिहिण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यावर तिन्ही आरोपींनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
या अर्जाला विशेष सरकारी वकील ॲड. प्रमोद बोंबटकार यांनी विरोध केला. तिघा आरोपींचा इतर आरोपींबरोबर गुन्ह्यात सहभाग आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहन, पिस्तूल काढून दिले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील चित्रण जप्त झाले आहे. आरोपींनी मोक्का कायद्यानुसार कबुलीजबाब दिला आहे. त्यांना जामीन दिल्यास ते फरार होण्याची शक्यता असून ते तपासात ढवळाढवळ करतील, त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.