पुणे : हॉटेलला रेटिंग दिल्यास चांगले पैसे देतो सांगत एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. २) गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, सचिन भवानराव नाईक (वय- ५५, रा. कोथरूड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्याप्रमाणे हा प्रकार ३१ जानेवारी २०२४ ते २ मार्च २०२४ यादरम्यान घडला आहे. तक्रारदार यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून एक मेसेज आला. एका नामांकित कंपनीची एचआर बोलत असल्याचे सांगून पार्ट टाइम जॉब ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे चांगले पैसे कमावता येतील, असे सांगितले. हॉटेल आणि रेस्टोरंटला रेटिंग देण्याचे काम असल्याचे सांगून एका रेटिंगमगे १५० रुपये मिळतील, असे सांगितले. तक्रारदार यांनी काम करण्यास होकार दल्यावर त्यांना एका ग्रुपमध्ये ऍड केले. काही लिंक पाठवून देण्याचे काम करायला सांगितले. काम पूर्ण केल्यावर सुरुवातीला मोबदला देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर गुंतवणुक केल्यास आणखी नफा मिळेल असे आमिष दाखवून प्रीपेड टास्कच्या नावाखाली एकूण २५ लाख ४९ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. काही कालावधीनंतर परतावा मिळणे बंद झाल्याने आणि भरलेले पैसेही निघत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास संदीप देशमाने करत आहेत.