पुणे : पुण्यामध्ये महिंद्रा कंपनी त्यांच्या व्यवसायाचे विस्तारीकरण करून दहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे, तर बजाज कंपनी मुंढवा येथे पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, केंद्र शासनाने रायगड येथे लेदर क्लस्टरला मंजुरी दिलेली आहे. ३८५ कोटींचा पायाभूत सुविधांचा खर्च महाराष्ट्र सरकारकडून केला जाणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या व्यवसायवृद्धीतून वीस ते पंचवीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
१ लाख रोजगार निर्मिती आगामी काळात होईल
महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात एकही कॅबिनेट सबकमिटी झाली नव्हती. मात्र, आता एका वर्षात तीन वेळा सबकमिटी बैठक झाली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांशी संबंधित गुंतवणुकीवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले आहेत. मागील बैठकीत ४५ हजार कोटींच्या, तर कालच्या बैठकीत ३९ हजार ९०० कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. मुंबईतील झवेरी बाजार हा नवी मुंबईत स्थलांतरित करण्यात येत असून, त्या ठिकाणी २१ एकरची जागा त्यांना देण्यात आली आहे. २० हजार कोटींची गुंतवणूक या ठिकाणी होणारा असून १ लाख रोजगार निर्मिती आगामी काळात होईल.
कोकणातील दापोली बंदराचा होईल विकास
कोकणातील दापोली येथील हर्णै बंदर या ठिकाणी २०५ कोटींची तर राजापूर तालुक्यात नाटे बंदर येथे १५४ कोटींच्या गुंतवणुकीस देखील मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मागील एक वर्षाच्या काळात विकासात्मक आणि गतिमान शासन निर्णय प्रक्रिया झालेली आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये देण्याची तीन वर्षांपूर्वी घोषणा झाली, परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. मात्र, आम्ही सात हजार ९३ कोटी रुपये देण्यात यशस्वी ठरलो आहे. तसेच सतत पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना देखील १५०० कोटींची मदत दिली गेली आहे. जलयुक्त शिवार अभियान ५ हजार गावात राबवण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.