ओतूर (पुणे) : नगर - कल्याण महामार्गावरील ओतूरजवळील डुंबरवाडी (ता. जुन्नर) येथील शेतकरी प्रमोद ऊर्फ सोन्या दत्तात्रय डुंबरे यांच्या बैलगाडा शर्यतीत धावणाऱ्या ‘बजरंग’ या बैलाची विक्री तब्बल २५ लाख रुपयाला झाली. त्यामुळे ओतूर परिसर व तालुक्यात ‘बजरंगाची कमाल अन् बैलमालकाची २५ लाखांची धमाल’ अशी सर्वत्र चर्चा होत आहे.
बैलगाडा शर्यती हा विषय ग्रामीण भागातील गाडा-बैलमालक व हौशी शेतकरी यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. पण कित्येक दिवस या बैलगाडा शर्यतीवर शासनाची बंदी होती. आता त्या शर्यतींना शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील यात्रा-जत्रा येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटात बैलगाडे धावू लागले आहेत, त्यामुळे बैलगाडामालक शौकीन सुखावले आहेत. बैलगाडा शर्यतीस ठिकठिकाणी प्रारंभ झाला. ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांमध्ये बैलगाडा घाटात भंडाऱ्याची उधळण व धुराळा उडताना दिसत आहे.
हौसेला मोल नसते असे म्हणतात या म्हणीचा अनुभव ‘बजरंग’ बैल खरेदीच्या निमित्ताने आला आहे. आणे माळशेज मार्गावरील दांगटवाडीचे सुप्रसिद्ध उद्योजक किशोर दांगट व बंधू बाबाराव दांगट या दोन बधूंनी डुंबरवाडी येथील बजरंग या शर्यतीच्या बैलांची खरेदी चक्क २५ लाख रुपयांना केली आहे.
धानोरी (ता. मावळ, पुणे) येथे बैलगाडा शर्यती झाल्या त्या शर्यतीत डुंबरवाडीच्या बजरंग बैलाने शर्यतीत कमाल दाखवून नंबर वन बाजी मारून रसिकांना कमाल दाखवत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या धावण्याने गाडा रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हा बजरंग बैलगाडा शौकिनांच्या मनात घर करून राहिला आहे. बजरंग बैलांची विक्री करणारे डुंबरवाडीचे प्रमोद ऊर्फ सोन्या डुंबरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बजरंग हा गाड्यांचा बैल दांगट बंधूंना २५ लाख रुपयास दिला आहे. दांगट बंधूंनी प्रथम १९ लाखाला मागणी केली होती; परंतु डुंबरे यांनी नकार दिला तेव्हा दांगट बंधूंनी २५ लाख रुपये देऊन बजरंगाची खरेदी केली.