पुणे : बकरी ईदच्या दिवशीच मेंदू मृत झालेल्या मुस्लिम समाजातील तरूणाच्या कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मृत्यूशी झुंज देत असलेल्या पुण्यातील दोघांसह तिघांना जीवनदान तर एकाला दृष्टी मिळाली आहे.युनूस सत्तार शेख (वय ३७, रा. नळदुर्ग, जि. उस्मानाबाद) याचे यकृत, स्वादूपिंड, २ मूत्रपिंड आणि दोन डोळे अशा सहा अवयवांचे दान करण्यात आले. युनुस हे उस्मानाबाद जिल्हा परिषदेत लिपिक होते. त्यांच्यामागे आई, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. त्यांचा १९ आॅगस्ट रोजी तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे अपघात झाला होता. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर सोलापूर येथील अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने २१ आॅगस्ट रोजी डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड (मृत मेंदु) म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातील समुपदेशकांनी त्यांची पत्नी, मुले व नातलगांशी चर्चा करून अवयवदान करण्यासाठी विनंती केली. शेख यांचे इतर अवयव चांगले असल्याने गरजु रुग्णांचे प्राण वाचू शकतात, या भावनेतून कुटूंबियांनी अवयवदानास संमती दिली.युनूस शेख यांचे यकृत ससून रुग्णालयात तर १ मुत्रपिंड व स्वादूपिंड पुण्यातीलच सह्याद्री रुग्णालयातील रुग्णांना देण्याचा निर्णय झाला. तर दुसरे मुत्रपिंड अश्विनी रुग्णालयातील रुग्णास आणि दोन डोळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णासाठी दान करण्यात आले. बुधवारी ग्रीन कॉरिडॉर करून यकृत, मूत्रपिंड व स्वादूपिंड ससून व सह्याद्री रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा संबंधित रुग्णांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ससून रुग्णालयामध्ये सातारा येथील ५८ वर्षीय पुरुषावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया, तर सह्याद्री रुग्णालयातील ४२ वर्षीय पुरुषावर मूत्रपिंड व स्वादूपिंडाची शस्त्रक्रिया करण्यात आली. बकरी ईदच्या दिवशीच युनूस शेख यांच्या अवयवदानामुळे रुग्णांना जीवनदान मिळाल्याने जगाला सामाजिक सलोख्याचा संदेश मिळाला आहे.
बकरी ईदला युनूसमुळे तिघांना जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 2:37 AM