पुणे : बालकुमार साहित्य संमेलन तसेच बालवाङ्मय पुरस्काराचे आयोजन करणाऱ्या बालकुमार साहित्य संस्थेचे अखेर पुनरुज्जीवन झाले आहे. जुन्या आणि नव्या कार्यकारिणीतील वाद, जुनी कार्यकारिणी बरखास्त, अस्थायी समितीची स्थापना, संस्थेची सर्वसाधारण सभा अशा घडामोडींनंतर तब्बल अडीच वर्षांनी अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे या नावाने संस्थेला मुहूर्त गवसला आहे. बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांची सर्वानुमते संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आगामी आठवड्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन यंदाच्या बालकुमार साहित्य संमेलनावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. डॉ. संगीता बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांचे कार्यकारी मंडळ निवडण्यात आले आहे. संस्थेच्या दैनंदिन कामासाठी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेने आपले ‘हिंदी भवन’ दिलेले आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन लवकरच करण्यात येईल. कार्यकारी मंडळातील सर्व सभासद बालसहित्याशी निगडीत आहेत. संस्थेने पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाचा श्रीगणेशा केला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी अध्यक्ष डॉ. संगीता बर्वे, उपाध्यक्ष माधव राजगुरु, कार्यवाह मुकुंद तेलीचेरी, सहकार्यवाह सुनील महाजन, कोषाध्यक्ष डॉ. दिलीप गरुड आदी पदाधिकारी उपस्थित होते.अमरेंद्र गाडगीळ, भा. रा. भागवत, श्रीधर राजगुरु, सुधाकर प्रभू, पु. ग. वैद्य आदी साहित्यिकांनी मिळून अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे बालकुमार साहित्य संमेलने, वाचक मेळावे, कथाकविता लेखन शिबिरे, स्वस्त पुस्तक प्रकाशन असे उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात येत असत. कालांतराने या संस्थेच्या नावात करुन अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था असे नामकरण करण्यात आले. मधील काळात संस्थेकडून फारच कमी काम होऊ लागले. त्यासाठी संस्थेच्या सर्वसाधारण सभेची बैठक न. म. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली. त्यामध्ये मुकुंद तेलीचेरी यांच्या अध्यक्षतेखाली एक अस्थायी समिती नेमण्यात आली. माधव राजगुरु यांच्याकडे घटना तयार करण्याचे काम सोपवण्यात आले. घटना तयार झाल्यानंतर तिच्यातील त्रुटी दूर करुन एक घटना तयार करण्यात आली. त्याला सर्व सभासदांकडून मान्यता घेण्यात आली. संस्थेचे पुनरुज्जीवन करुन संस्था नोंदणीकृत करण्यासाठी कार्यकारी मंडळाची निवड आवश्यक होती. त्यासाठी ११ जून २०१७ रोजी न. म. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेची बैठक बोलावण्यात आली. त्यामध्ये प्रथम संस्थेच्या नवीन नामकरणाला सर्व सदस्यांनी बहुमताने मान्यता दिली आणि संस्थेच्या पुनरुज्जीवनाला अखेर मुहूर्त मिळाला.
बालकुमार साहित्य संस्थेचे अखेर पुनरुज्जीवन; अध्यक्षपदी संगीता बर्वे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 5:06 PM
बालकुमार साहित्य संमेलन तसेच बालवाङ्मय पुरस्काराचे आयोजन करणाऱ्या बालकुमार साहित्य संस्थेचे अखेर पुनरुज्जीवन झाले आहे. बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांची सर्वानुमते संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्देअडीच वर्षांनी अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे या नावाने संस्थेला गवसला मुहूर्त डॉ. संगीता बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आले ११ जणांचे कार्यकारी मंडळ