कसबा पोटनिवडणुकीतून बाळासाहेब दाभेकर यांची माघार; अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 12:57 PM2023-02-09T12:57:21+5:302023-02-09T12:59:07+5:30
सलग ४० वर्षे काम करत असूनही पक्ष विचार करत नसेल तर मग असा निर्णय घेण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसल्याचे दाभेकर यांनी सांगितले होते
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिचंवड मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यावर दोन्ही मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार इच्छुक होते. कसबा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून तीन इच्छुक उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली होती. रवींद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे हे तीन उमेदवार होते. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेस कसबा लढवण्यावर शिक्कामोर्तब झाला. आणि रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर बाळासाहेब दाभेकर नाराज झाले होते. व त्यांनी अपक्ष लढणार असल्याचे ठरवले. परंतु आज अखेर दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी केली. त्यामुळे कालच काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी केली. मात्र, त्यांनी याबाबत कुठलाही निर्णय कळवला नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, धनंजय वाडकर, अभय छाजेड, कमल व्यवहारे, अजित दरेकर, रफिक शेख, मेहबूब नादाफ यांनी दाभेकर यांच्याशी चर्चा केली. पक्षाच्या वतीने तुम्हाला पुढे संधी देण्यात येईल असेही सांगण्यात आले. आज अखेर पक्षश्रेष्ठींचे ऐकून कसबा विधानसभा पोटनिवडणूकीतून दाभेकर यांनी माघार घेतली आहे.
‘बंडखोरी करू नका’ या विनंतीला दिला होता नकार
काँग्रेस नेत्यांच्या ‘बंडखोरी करू नका’ या विनंतीला नकार देत बाळासाहेब दाभेकर यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत बंडखाेरी केली होती. त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती, मात्र पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली. सलग ४० वर्षे काम करत असूनही पक्ष विचार करत नसेल तर मग असा निर्णय घेण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही, असे दाभेकर यांनी सांगितले होते.