लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पर्वती येथील मित्रमंडळ चौकातील पुणे महापालिकेचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना लायन्स क्लब ऑफ पूना आय फाउंडेशन यांना २० वर्षांच्या भाडे कराराने देण्याचा घाट घातला आहे. शिवसेनेने या प्रस्तावावर आक्षेप घेतल्याने हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना पालिकेच्या संयुक्त विद्यमाने नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा व उपचार प्रकल्प २० वर्षे मुदतीच्या कराराने चालविण्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. त्यासाठी लायन्स क्लब ऑफ पूना आय फाउंडेशन यांची एकच निविदा आली होती. या निविदेला स्थायी समितीने मान्यता देऊन हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. लायन्स क्लब ऑफ पूना आय फाउंडेशन यांच्याकडून नेत्रचिकित्सा आणि दंतचिकित्सा उपचार प्रकल्प सेवा सुविधा सीजीएचएस १२ टक्के कमी दराने आकारण्यात येणार आहेत. या कराराबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचे प्रस्तावात नमूद केले आहे.
सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव पुकारल्यानंतर शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले, शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक अशोक हरणावळ यांनी हा दवाखाना उभारला आहे. त्यामुळे या प्रस्तावाबाबत शिवसेनेला विश्वासात घेतले नाही. पालिकेचा दवाखाना २० वर्षे कराराने देण्याची घाई का, असा सवाल सुतार यांनी केली. सभागृहात शिवसेनेचे नगरसेवक आता उपस्थित नाहीत. त्यामुळे हा प्रस्ताव पुढे ढकलावा, असे सुतार यांनी सांगितले. त्यावर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात असल्याचे सांगितले. त्यानुसार उपसूचना देऊन हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला.