पुणे : फक्त तक्रारी करू नका, सुचनाही करा, त्याची नक्की दखल घेऊ अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सायंकाळी पक्षाच्या शहर संघटनेतील पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. संघटनेचे काम करताना पदाधिकाऱ्यांकडून काही कमी जास्त गोष्टी घडत असतात, मात्र संघटना व शिस्तच महत्वाची मानली पाहिजे असे त्यांनी सांगितले.मंत्री झाल्यानंतर थोरात दोन वेळा पुण्यात कार्यक्रमांसाठी म्हणून आले होते, मात्र त्यांनी काँग्रेसभवनमध्ये जाणे टाळले. त्याविषयी पदाधिकारी, कार्यकर्त्यामध्ये चर्चा होती. शुक्रवारी पुण्यात आले असताना काँग्रेस भवनला भेट देऊन थोरात यांनी या चर्चेला पुर्णविराम दिला. शहरातील काही जाहीर कार्यक्रमांनंतर थोरात सायंकाळी काँग्रेस भवनला आले. पक्षाच्या आजी माजी लोकप्रतिनिधींसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही यावेळी गर्दी केली होती.थोरात यांनी माध्यमप्रतिनिधीं बरोबर संवाद साधल्यानंतर या पदाधिकाऱ्यांना वेळ दिला. काँग्रेसचा विचार देशाला तारणारा विचार आहे. तोच शाश्वत आहे. त्यामुळे लहानसहान गोष्टींवरून नाराज होणे योग्य नाही. पक्षासाठी पुर्ण वेळ द्या, पक्ष वाढला की काम करणारेही वाढतात असे त्यांनी सांगितले. शहर संघटनेत काही बदल करावेत अशा मागणीवर त्यांनी काहीही भाष्य केले नाही. पक्षाच्या ब्लाॉक अध्यक्षांबरोबर त्यांनी चर्चा केली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनाही त्यांनी फक्त तक्रारी करू नका, सुचनाही करत जा, त्यांची पक्षस्तरावर नक्की दखल घेऊ असे आश्वासन दिले.दरम्यान थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला महिला आघाडी तसेच पक्षाच्या अन्य काही आघाड्यांचे प्रमुख व संघटनेतील काही महत्वाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यांच्यापैकी काही जणांकडून त्याची माहितीच आम्हाला दिली गेली नाही अशी तक्रार करण्यात येत आहे. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी त्याचा इन्कार केला. सर्वांना व्यवस्थित माहिती दिली होती, पक्षाच्या कार्यक्रमाला स्वत: होऊन येणे अपेक्षित असते असे बागवे म्हणाले.मोहन जोशी, माजी आमदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य : थोरात काँग्रेस भवनला आले नाही या टिकेत काही तथ्य नाही. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते आतापर्यंत चार वेळा काँग्रेस भवनला आले आहेत. पक्षाचे शहरातील सर्व आजीमाजी लोकप्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित होते.
...अखेर बाळासाहेब थोरात पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये आले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 4:54 PM