मंचर (पुणे) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लांडेवाडी चिंचोडी ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शिवसेना उपनेते,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे सरपंच तसेच १२ सदस्य मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आले आहेत.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी चिंचोडी ग्रामपंचायतच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मागील पंचवार्षिकला आढळराव पाटील यांच्या पॅनलने सर्व जागा जिंकल्या होत्या. यावेळी श्री. भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली गेली. त्या विरोधात कुलस्वामी खंडेराया पॅनल निवडणूक रिंगणात होते.
श्री. भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या शशिकला तानाजी मलिक या बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या. आज झालेल्या मतमोजणीत सरपंचपदी श्री. भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या संगीता प्रदीप शेवाळे या मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. त्यांनी रोहिणी रामदास शेवाळे यांचा पराभव केला. श्री. भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे सतीश आबाजी शेवाळे, सचिन रामदास शेवाळे, सचिन रामदास ढेरंगे, शशिकला अंकुश शेवाळे, अंकिता बाळासाहेब शेवाळे, संदीप तुकाराम बोकड, शांताबाई दत्तू खंडागळे, शीतल गणेश पानसरे, अंकुश शिवाजी लांडे, उर्मिला कांतीलाल शेवाळे, आशा बाळासाहेब शेवाळे हे मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आले आहेत.
कुलस्वामी खंडेराय पॅनलचे समीर भगवान ढेरंगे हे एकमेव विजयी झाले आहेत. विद्यमान सरपंच अंकुश लांडे यांनी सदस्यपदी विजय संपादन केला तर माजी सरपंच शांताबाई खंडागळे याही निवडून आल्या आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथील निवासस्थानी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. लांडेवाडी गावातून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी गुलालाची व भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. एकच वादा शिवाजी दादा,जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देण्यात आल्या.