पुणे : शाळेत कधी अभ्यास न केल्याने तर कधी शिक्षकांचे न ऐकल्याने मिळणारा छडीचा मार... हात आणि पाठीवर वळ उठेपर्यंत विद्यार्थ्यांना केलेली मारहाण... काही वेळेस शिक्षकांच्या वाईट नजरेला बळी पडणारे विद्यार्थी तर कधी आपल्याच वर्गमित्रांकडून होणारा त्रास... अशा एक ना अनेक गोष्टी रोखण्यासाठी, अन्याय व छेडछाडीविरोधात आता बालसेनाच लढण्यास सज्ज झाली.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. कधी त्या समस्या शारीरिक असतात, तर कधी मानसिक. मुले आपल्या समस्या कोणाला सांगायच्या आणि कशा सांगायच्या, या अडचणीत असतात. काही गोष्टी उघडपणे सांगायला त्यांना भीती वाटते, मग अशा वेळेस मनामध्ये काही गोष्टी ठेवून ती एकलकोंडी होतात व शाळेचा तिटकारा करू लागतात. अशा विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांच्याच माध्यमातून सोडविण्यासाठी ज्ञानदेवी चाइल्डलाइनने पुढाकार घेतला असून २५० शाळांमध्ये बालसेनेची स्थापना केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना हक्काचा एक मित्रच उपलब्ध झाला आहे. बालसेनेअंतर्गत प्रत्येक शाळेत ७ वी, ८ वी व ९ वीच्या वर्गातील दोन विद्यार्थी लीडर म्हणून निवडले जातात. विद्यार्थी आपल्या समस्या या लीडरपुढे मांडतात. त्या समस्यांवर योग्य तोडगा काढून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी लीडरची असते. काही वेळेस प्रश्न इतके गंभीर असतात, की लीडर ते सोडवू शकत नाही. मग अशा वेळेस चाइल्डलाइनच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते. महिन्यातून एकदा ते प्रत्येक शाळेला भेट देतात व विद्यार्थ्यांच्या कठीण समस्यांचे निराकरण करतात. काही वेळेस प्रकरण हाताबाहेर गेले तर पोलीस तक्रारही केली जाते. मदतीसाठी वर्षभराच्या बालकापासून ते १८ वर्षांच्या मुलांपर्यंत अनेक गंभीर स्वरुपाच्या तक्रारींचे फोन या हेल्पलाइनवर येतात. शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये ४० ते ५० टक्के तक्रार नोंदविण्याचे प्रमाण असल्याचे या चाइल्डलाइनच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्ञानदेवी चाइल्डलाइनने पुण्यातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद साधला. त्यांचे प्रश्न, अडचणी यावर त्यांना मार्गदर्शन तर केलेच जाते; पण काही केसेसमध्ये विद्यार्थ्यांचे योग्य समुपदेशनही केले जाते. शिक्षक आणि मुख्याध्यापकांना समज दिली जाते. मुलांवर हात न उचलता त्यांना समजावून सांगून प्रश्न सोडवा, असे या अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. विद्यार्थ्यांना मारहाण, शिवीगाळ करणे, त्यांच्याशी नको त्या भाषेत बोलणे या गोष्टींवर कायद्यानेच बंदी आहे. काही वेळेस वैयक्तिक फ्रस्ट्रेशन विद्यार्थ्यांवर काढले जाते. त्यांना अन्यायकारक शिक्षा दिली जाते. मुले मारल्याने कोडगी होतात, त्यामुळे त्यांना प्रेमाने समजावले पाहिजे. बालसेनेच्या माध्यमातून आम्ही मुलांनाचा लीडर करतो आणि त्यांचे प्रॉब्लेम सोडविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर देतो. - अनुराधा सहस्रबुद्धे संचालिका, ज्ञानदेवी चाइल्डलाइन)एका विद्यार्थ्याला शाळेतीलच काही मुलांकडून त्रास दिला जायचा. त्याची टिंगल करणे, त्याच्यावर हसणे, एकटे पाडणे अशा प्रकारांमुळे तो मुलगा खचून गेला होता. त्याला चाइल्ड हेल्पलाइनबाबत शाळेतूनच माहिती मिळाल्यानंतर त्याने फोन केला आणि आम्ही त्याचा प्रॉब्लेम सोडवला. - सुचेता लोंढे (को-आॅर्डिनेटर, ज्ञानदेवी चाइल्डलाइन)
अन्यायाविरोधात लढणार बालसेना
By admin | Published: November 09, 2015 2:22 AM