पिंपरी : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीचे आकर्षण असलेले किल्ले बनविण्यासाठी बालचमूंची लगबग दिसून येत आहे. मात्र, शहरातील टोलेजंग इमारती, घराच्या परिसरातील टाकण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉग्स, डांबरी रस्त्यांमुळे किल्ला तयार करण्यासाठी लागणारी माती व दगड कोठुन आणायचे? याचा प्रश्न बालमचूंपुढे पडला आहे. तरीही मिळेल त्या कृल्प्त्या लढवून किल्ले बनविण्याची मोहीम फत्ते करण्याची या छोट्या मावळ्यांची लगबग सुरू दिसत आहे. दिवाळीची आतुरता ही लहान-मोठया सगळयांनाच लागलेली आहे. सहामाही परीक्षा संपल्याने बालचमूंना किल्ला बनविण्याचे वेध लागले आहे. या छोट्या मावळ्यांना किल्ला बनवायचा कोठे, त्याचे सामान कोठून आणायचे, मावळे कसे गोळा करायचे, याबाबत व्यूहरचना आखण्यात गुंग झालेले दिसून येत आहे. परिसरात पेव्हिंग ब्लॉग्ज व डांबरी रस्ते तयार झाल्याने माती व दगड कोठून आणायचे याचा प्रश्न पडला आहे. तरीही यावर उपाय म्हणून काहीजण कुंड्यांच्या झाडांतील माती व दगडांऐवजी थर्मोकॉल, टोपली, जुनी बादली तसेच घरातील जुने पुराने सामान गोळा करून किल्यावर पोते टाकून त्यावर माती सरावून किल्ला तयार करताना दिसत आहे. जलदुर्ग, गिरीदुर्ग, भुईकोट किल्ला असे विविध प्रकारातील किल्ले साकारले जात आहे. किल्यावर तट, बुरज, दरवाजे, सुळके, पाण्याची टाकी, मंदिरे, गडावरील दारूगोळाचे ठिकाण तयार करण्यासाठी प्लॅस्टर आॅफ पॅरीसचा वापर करण्यात येत आहे.पिंपरी-चिंचवड परिसरातील काही वषार्पासून राजकीय पक्ष, विविध मंडळांनी किल्ले बनवण्याच्या स्पर्धा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे किल्ले बनवताना मुलांचा उत्साहही वाढत आहे. त्यांना लागणारे आवश्यक ते साहित्य पुरविल्याने बालचमूंचा उत्साही वाढलेले दिसून येत आहे. विविध मंडळांकडून किल्ले बनविण्याच्या स्पर्धा होत आहे. या आकर्षक किल्ले बनविणाऱ्यांना बक्षीसही जाहीर केलेले आहे. किल्ले बनविणे हे जरी पारंपरिक असले तरी लहान मुलांकडून त्यामध्येही वेगवेगळया क्लृप्त्या लढवत त्याला आधुनिक आणि अधिक आकर्षक रूप देण्याचा प्रयत्न लहान मुलांकडून सुरू आहे. काही मुलांनी इंटरनेटवरून रायगड, प्रतापगड, शिवनेरी, जंजिरा, सिंधुदुर्ग, पन्हाळा अशा अनेक किल्यांचे छायाचित्र काढून त्याप्रमाणे किल्ला उभारण्यास सुरुवात केली आहे. किल्यावर आजूबाजूला हिरवळ दाखवण्यासाठी मोहरी, अळीवची पेरणी केली आहे. (प्रतिनिधी)आम्ही दगड, मातीचेच किल्ले बनवतो. किल्यासाठी लागणारे मावळे, तोफा, हत्ती, घोडे, शिवाजी महाराज हे मात्र आम्ही विकत आणतो. सध्या बाजारात प्लॅस्टर आॅफ पॅरिसने बनवलेले किल्लेही उपलब्ध आहेत. ते विकत आणून सजवले जातात. पण, आम्ही मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन वेगवेगळे किल्ले बनवतो. बाजारात तयार किल्ले जर मिळत असले तरीही मातीचा स्वत: बनविलेला किल्ला तयार करण्याची मजा काही औरच असते, असे किल्ले बनविणाऱ्या निपुण पटवर्धन, साई परब, समृद्धी मोरे, संपदा मोरे, शार्दुल तापकीर या बालचमूंनी सांगितले.
किल्ले बनविण्यास सरसावले बालमावळे
By admin | Published: October 25, 2016 6:24 AM