‘बालभारती’तर्फे बाजारपेठेत विक्री करण्यासाठी आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वितरण करण्यासाठी कोट्यवधी पुस्तकांची छपाई करावी लागते. परंतु, पुस्तक छपाईसाठी लागणाऱ्या कागदाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असल्यामुळे बालभारतीला पुस्तक छपाईला लागणारा पुरेसा कागद उपलब्ध होऊ शकला नाही.मात्र, बाजारात विक्री केल्या जाणाऱ्या सुमारे चार-साडे चार कोटीहून अधिक पुस्तकांच्या छपाईचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे बाजारात पुस्तकांचा तुटवडा जाणवणार नाही.
बालभारतीला दर वर्षी सुमारे नऊ कोटी पुस्तकांची छपाई करावी लागते. परंतु, यंदा सुमारे सात कोटी पुस्तकेच सर्व शिक्षा अभियान अंतर्गत वितरित केली जाणार आहेत. मागील वर्षाची तब्बल दोन कोटी पुस्तके बालभारतीकडे शिल्लक असून यंदा सुमारे तीन कोटी पुस्तके छापली केली आहेत. त्यामुळे वितरणासाठी दोन कोटी पुस्तकांचा तुटवडा जाणवणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरूपात पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले होती. विद्यार्थ्यांनी तब्बल तीन कोटी पुस्तके डाऊनलोड करून घेतली होती. यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांना पुस्तके डाऊनलोड करून घेता येणार आहेत. तसेच शिक्षण विभागाकडून जमा करून घेतले जाणारे जुनी पुस्तके सुद्धा विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. परंतु ,शिक्षण विभागाकडून दर वर्षी शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांच्या हातात नवी कोरीकरकरीत पुस्तके दिली जातात. मात्र, यंदा अनेक विद्यार्थ्यांना ही पुस्तके मिळणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.