पुणे : उमेदवारी अर्ज भरण्यापासूनच घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग ७, १४ आणि १६ मधील उमेदवारांमध्ये असलेली जबरदस्त चुरस आणि त्यामुळे निकालानंतर कोणतेही पडसाद उमटू नये, यासाठी प्रशासनाने काळजी घेताना या प्रभागाची मतमोजणी प्रभागापासून खूप दूर असलेल्या बालेवाडी येथील छत्रपती शिवाजीमहाराज क्रीडा संकुलात घेण्याचा निर्णय घेतला आहे़ घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक ७ मधील उमेदवार रेश्मा भोसले यांच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीचे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते़ तसेच प्रभाग १४ मध्ये ज्योत्स्ना एकबोटे आणि ज्योत्स्ना सरदेशपांडे या दोन्ही उमेदवारांना भाजपने ए व बी फॉर्म दिल्याने अधिकृत उमेदवारीविषयी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीनंतर दुसऱ्या दिवशी निकाल दिला होता़ अशीच परिस्थिती प्रभाग १६ मध्ये काँग्रेसच्या ए व बी फॉर्मवरून निर्माण झाली होती़ उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी गणेश बीडकर आणि रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती़ त्यामुळे या तीनही प्रभागात ताणतणाव दिसून आला आहे़ शहरातील सर्वाधिक विद्यमान आणि माजी नगरसेवक या प्रभागात असल्याने तिन्ही प्रभागातील १२ पैकी ८ प्रभागात तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर उभे असून त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर चुरस आहे़ या प्रभागातील घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात मागील महापालिका निवडणुकीत मतमोजणी झाली होती़ पण, ही जागा कमी पडत असल्याचे दिसून आले़ त्यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये उमेदवारांची नावे समाविष्ट करणे, सर्व २९१ मतदान केंद्रांवर आवश्यक ती कागदपत्रे व साहित्य एकत्रित करण्याचे काम कृषी महाविद्यालयातील बॅडमिंटन हॉल येथे केले जात आहे़ येथूनच व्होटिंग मशिन सर्व मतदान केंद्रांवर पाठविले जाणार असून मतदानानंतर ते पुन्हा इथेच जमा करण्यात येणार आहे़ कृषी महाविद्यालयात मतमोजणीसाठी मोठी जागा आहे़ ही जागा या क्षेत्रीय कार्यालयातील तीनही प्रभागाच्या दृष्टीने मध्यवर्ती असल्याने मतमोजणीच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे़ त्यातून तणाव निर्माण होण्याची अधिक शक्यता असल्याने या प्रभागापासून खूप लांब असलेल्या बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे़ जेणे करून मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, या अपेक्षेने ही मतमोजणी लांब ठेवण्यात आली असल्याचे सांगण्यात येते़ (प्रतिनिधी)- शहरात १४ ठिकाणी मतमोजणी होणार असून बाकी मतमोजणीची १३ ठिकाणे ही त्या क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातच आहे़ फक्त घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील मतमोजणी या क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरापासून लांब ठेवण्यात आली आहे़ ती केवळ सुरक्षेच्या कारणामुळे असल्याचे सांगितले जाते़- मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी, शिपाई सेवक व राखीव कर्मचारी यांची घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागात नेमणूक करण्यात आली आहे़ त्यांनी सोमवारी २० फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता कृषी महाविद्यालयातील बॅडमिंटन हॉल येथे उपस्थित रहावे, असे निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी सांगितले आहे़
घोले रोड कार्यालयाची मतमोजणी बालेवाडीला
By admin | Published: February 19, 2017 4:58 AM