पुणे : कन्हैया कुमारच्या सभेसाठी पोलिसांनी बालगंधर्व रंगमंदिराबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता. दुपारी तीनपासूनच त्याच्या सभेसाठी गर्दी जमायला सुरुवात झाली होती. सभागृह खचाखच भरल्यानंतर कार्यकर्त्यांना आतमध्ये सोडणे पोलिसांनी थांबवले. केवळ पासधारकांनाच आतमध्ये सोडण्यात येत होते. सभा ऐकण्यासाठी आतमध्ये सोडावे म्हणून कार्यकर्त्यांनी गेटवरच जोरदार घोषणाबाजी केली. सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी दोन्ही गेटवर चोख बंदोबस्त ठेवलेला होता. स्वत: अतिरीक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे बंदोबस्तावर देखरेख ठेवून होते. यासोबतच परिमंडल एकचे उपायुक्त तुषार दोषी, वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड, विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तामध्ये तैनात होते. पोलिसांनी रंगमंदिराच्या भोवती दुपारपासूनच अक्षरश: कडे केले होते. नागरिक रेलिंगवरुन चढून आतमध्ये जाऊ नयेत याचीही काळजी घेतली होती. सभेसाठी झालेली मोठी गर्दी आतमध्ये घुसू नये याकरिता दोन्हीही गेट बंद करण्यात आलेली होती. केवळ पासधारकांनाच आतमध्ये सोडण्यात आले होते. सभा सुरु झाल्यानंतर मात्र बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी आतमध्ये सोडा अशा घोषणा दिल्या. महापुरुषांच्या नावाच्या घोषणा देऊन पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी कोणालाही नंतर आतमध्ये सोडले नाही. संध्याकाळी कन्हैयाचे बालगंधर्व रंगमंदिरात आगमन झाल्यानंतर गेटजवळील गर्दी हटवत पोलिसांनी सर्वांना रस्त्याच्या दुस-या बाजुला उभे केले. विरोध मावळला : एकही संघटना हजर नाहीविरोध करायला एकही संघटना किंवा पक्षाचे कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिराजवळ आले नाहीत. सर्व हिंदुत्ववादी संघटना कन्हैयाच्या सभेबाबत सपशेल ‘बॅकफुट’वर गेल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले. सनातन संस्थेने दुपारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईमध्ये झालेल्या सभेमध्ये पुरोगामी कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करणारे पुस्तकाचे वितरण केल्यामुळे त्याच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली. काश्मिरमध्ये फडकवल्या जाणा-या इसिसच्या झेंड्यांबाबत तसेच नक्षलवादी कारवायांबाबत कन्हैया काहीही बोलायला तयार नसून त्याची कृती देशविरोधी असल्याचा आरोपही वर्तक यांनी केला.रामदेवबाबांवर टीका करताना कन्हैयाकुमार म्हणाला, ‘‘एक बाबाजी दररोज सकाळी आत घ्या, बाहेर सोडा, असे म्हणत असतो. मात्र, भुखेकंगाल लोकांनी काय आत घ्यायचे आणि काय सोडायचे. त्यांची सगळी उत्पादनेही इतकी महाग आहेत की गरीब माणूस ते घेऊच शकणार नाही.
बालगंधर्व रंगमंदिराला छावणीचे स्वरूप
By admin | Published: April 25, 2016 1:49 AM